गोवरी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकणे प्रकरण
राजुरा : राजुरा तालुक्यातील गोवरी गावातील नागरिकांच्या समस्या मार्गी लागत नसल्याचे कारणावरून संतापलेल्या नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ३० नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी प्रवीण घुमे यांनी शासकीय कामात अडथळे निर्माण करण्याबाबतची तक्रार दाखल केली. यावरून माजी सभापती सुनील उरकुडे, माजी सरपंच पौर्णिमा उरकुडे यांच्यासह १७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. यामुळे गावातील राजकीय वातावरण तापले आहे. गावातील प्रलंबित समस्या सुटत नसल्याने शनिवारी संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. ही घटना सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
. त्यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी कर्तव्यावर होते. ग्रामविकास अधिकारी हे पोवनी येथील ग्रामसभा असल्यामुळे कार्यालयाला पोहोचायचे होते. कार्यालयास नागरिकांनी कुलूप ठोकल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी प्रवीण घुमे हे ११.४५ वाजता ग्रामपंचायतीत हजर झाले. या घटनेची माहिती त्यांनी सरपंचांना दिली. तसेच पोलिस स्टेशनला तक्रार केली. ग्रामविस्तार अधिकारी यांनी आरोपींनी शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण करण्याचा आरोप तक्रारीमध्ये केला आहे. ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीमध्ये लिपीक सतीश पाचभाई, शिपाई मारुती बावीस्कर, पाणीपुरवठा कर्मचारी रवींद्र शेंडे, संगणक परिचालक रमेश गाजुलवार, सफाई कामगार विष्णू केसकर उपस्थित होते. त्यामुळे कामकाज प्रभावित झाले अशी माहिती तक्रारीत आहे.
. ३० नोव्हेंबरला गोवरी येथेसुद्धा १२ वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने पवनी ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कारभार असल्याने ग्रामविस्तार अधिकारी घुमे हे पोवनी येथे सभेसाठी हजर होते. त्यानंतर गोवरी येथील ग्रामसभा होणार होती. यादरम्यान ही घटना गोवरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात घडली. या प्रकरणातील व्हिडिओ क्लिप काढण्यात आल्या होत्या. त्याच्या आधारे राजुरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. राजुरा पोलिसांनी या प्रकरणात आरोपींविरुद्ध १२६ (२), २२१ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक पारखी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
आम्ही ग्राम पंचायत ला प्रकरण शांत करण्यासाठी गेलो परंतु सदर प्रकरणाला राजकीय वळण देऊन प्रकरणात शामिल नसलेल्यांचेही नावे गुन्हात नोंदविण्यात आले. सुनील उरकुळे, माजी जि.प.सभापती


