Home चंद्रपुर जिल्हा विशेष जगन्नाथ बाबा वार्डातील ‘त्या’ दोन बिअर शॉपी कायमच्या बंद करा

जगन्नाथ बाबा वार्डातील ‘त्या’ दोन बिअर शॉपी कायमच्या बंद करा

6

रहिवाशांची पोलिस महासंचालकांकडे धाव

अपार्टमेंटच्या पार्किंगमध्येच रंगली दारू-मटन पार्टी

महिला व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण

“फक्त मतांसाठीच लोकप्रतिनिधी येतात काय ?” रहिवाशांचा संतप्त सवाल

चंद्रपूर : शहरातील दाताळा रोड परिसरातील जगन्नाथ बाबा वार्ड येथील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या पी.जे. बिअर शॉपी व पी.जी. बिअर शॉपी या दोन मद्यविक्री दुकानांविरोधात स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दोन्ही बिअर शॉपींमुळे परिसरातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली असून, त्या कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र पोलीस महासंचालक (मुंबई) यांच्याकडे थेट लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.

शाळा आणि मंदिराच्या परिसरात मद्यपींचा सुळसुळाट

स्थानिकांच्या माहितीनुसार, वैष्णवी अपार्टमेंटमध्ये सुमारे २१ निवासी कुटुंबे वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे, या अपार्टमेंटच्या अगदी समोर लहान मुलांचे कॉन्व्हेंट असून, मागील भागात ऐतिहासिक हनुमान मंदिर आहे. याच मुख्य मार्गावरून विद्यार्थी, पालक आणि स्कूल बसेसची सतत वर्दळ असते. मागील तीन ते चार वर्षांपासून सुरू असलेल्या या दोन्ही बिअर शॉपींमुळे सकाळी लवकरपासून ते रात्री उशिरापर्यंत येथे मद्यपींची मोठी गर्दी होते. दुकानांसमोरच दारू पिणे, अश्लील शिवीगाळ करणे, आपापसात भांडणे, रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभी करणे, प्लास्टिक ग्लास व कचरा फेकणे तसेच सार्वजनिक ठिकाणी लघवी व उलट्या करण्याच्या घटना येथे रोजच्याच झाल्या आहेत. या अत्यंत गलिच्छ आणि असुरक्षित वातावरणामुळे लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.

 पार्किंगमध्ये भरदिवसा दारू-मटन पार्टी; कायद्याचा धाक संपला ?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी या त्रासाने टोक गाठले. अपार्टमेंटच्या खाजगी पार्किंगमध्ये काही बाहेरील अज्ञात युवकांनी भरदिवसा दारू आणि मटन पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, येथील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. भरवस्तीत इतकी हिंमत दाखवणाऱ्या या बिअर शॉपी मालक आणि मद्यपींना नेमके कोणाचे राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण लाभले आहे ? या चर्चेला आता परिसरात उधाण आले आहे.

️ सोसायटीची परवानगी नाही; रस्त्यावरच ठोकले अतिक्रमण

नागरिकांनी असाही आरोप केला आहे की, संबंधित बिअर शॉपी चालकांनी सोसायटीची कोणतीही रीतसर परवानगी घेतलेली नाही. एवढेच नव्हे तर दुकानांच्या समोर थेट रस्त्यावर टीनाचे शेड आणि मोठे गेट उभारून अतिक्रमण केले आहे. या बेकायदेशीर शेडमुळे रस्त्याची रुंदी कमालीची कमी झाली असून, यामुळे या वर्दळीच्या मार्गावर रोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

“फक्त मतांसाठीच लोकप्रतिनिधी येतात काय ?” नागरिकांचा सवाल

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी केलेल्या तक्रारींनंतर प्रशासनाने काही काळासाठी या दुकानांवर सील ठोकले होते. मात्र, काही दिवसांतच सेटिंग करून ही दुकाने पुन्हा थाटात सुरू करण्यात आली. त्यामुळे आता केवळ तात्पुरती मलमपट्टी नको, तर प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करून दोन्ही बिअर शॉपींचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी होत आहे. या संपूर्ण गंभीर प्रकरणात स्थानिक नगरसेवक व आमदारांनी अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. लोकप्रतिनिधींच्या या उदासीनतेमुळे संतापलेल्या नागरिकांनी, “फक्त निवडणुकीत मतांसाठीच लोकप्रतिनिधी आमच्या दारात येतात काय ?” असा रोखठोक आणि संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

️ संयुक्त पाहणीची आणि कठोर कारवाईची मागणी

वैष्णवी अपार्टमेंटमधील त्रस्त नागरिकांनी आता या प्रकरणात आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. जिल्हा पोलिस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि चंद्रपूर महानगरपालिका यांनी तात्काळ संयुक्त पाहणी करावी, परिसरातील भीषण परिस्थितीची स्वतः दखल घ्यावी आणि नियमबाह्य चालणाऱ्या या दुकानांवर तात्काळ कुलूप लावून अतिक्रमण जमीनदोस्त करावे, अशी ठाम मागणी रहिवाशांनी केली आहे.

error: Content is protected !!