Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा येथील ‘माविम’च्या साधन केंद्रात गैरप्रकार

वरोरा येथील ‘माविम’च्या साधन केंद्रात गैरप्रकार

8

व्यवस्थापक यांच्या अजब कारभाराने बचत गटाच्या महिला संतप्त

१४ हजाराचे साहित्य अवघ्या ७ हजार सहाशे मध्ये

वसुंधरा उद्योग समूहाशी संगनमत करून महिलांची फसवणूक केल्याचा आरोप

वरोरा : महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे (माविम) चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये बचत गट कार्यरत असून, त्या माध्यमातून विविध महिलाभिमुख प्रकल्प राबवले जातात. मात्र, वरोरा येथील सावित्री लोकसंचालित साधन केंद्रात ‘नवतेजस्विनी महिला उद्यम विकास प्रकल्पा’ अंतर्गत लाखो रुपयांचा गैरप्रकार उघडकीस आला आहे. केंद्राचे व्यवस्थापक अमित बानकर यांनी स्वतःचे घर भरण्यासाठी बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करण्याऐवजी साहित्याची नियमबाह्य खरेदी करून दिल्याचा खळबळजनक प्रकार बचत गटांच्या महिलांच्या चर्चेतून समोर आला आहे.

नियम धाब्यावर बसवून साहित्य खरेदी

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पांतर्गत बचत गटातील महिलांना जीवामृत, दशपर्णी व गांडूळ खत निर्मितीकरिता प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. या साहित्यासाठी प्रति महिला अंदाजे १४ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते व सदर रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली होती. नियमानुसार, महिलांनी हे साहित्य स्वतः बाजारपेठेतून खरेदी करणे अपेक्षित होते. याबाबत जिल्हा कार्यालयातील जिल्हा प्रकल्प सल्लागारांच्या माध्यमातून बैठका घेऊन मार्गदर्शनही करण्यात आले होते.

.       परंतु, वरोराचे केंद्र व्यवस्थापक अमित बानकर यांनी नियमांना हरताळ फासत, सोलापूर येथील ‘वसुंधरा उद्योग समूह’ यांच्याशी संगनमत केले. बानकर यांनी स्वतः साहित्याची ऑर्डर देऊन खरेदी केली आणि हे साहित्य महिलांना वाटप करून त्याचे पैसे सोलापूरच्या कंपनीला पाठवण्यास सांगितले.

तपासणीत दुप्पट दराचा मोठा घोळ उघड

हा अफलातून कारभार माविमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रकल्प सल्लागारांमार्फत या साहित्याची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीत बाजारापेक्षा अत्यंत जास्त दर लावल्याचे सिद्ध झाले असून, ज्या साहित्यासाठी १४ हजार रुयापये वसूल केले गेले, त्याची बाजारातील प्रत्यक्ष किंमत अवघी ७ हजार सहाशे रूपयाच्या आसपास असल्याचे उघड झाले. तोपर्यंत अनेक निष्पाप महिलांनी सोलापूरच्या वसुंधरा उद्योग समूहाला रक्कम पाठवली होती.

वरिष्ठ कार्यालयाचे पत्र आणि बरखास्तीची मागणी

या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ कार्यालयाने दि. १४/०५/२०२६ रोजी अधिकृत पत्र जारी केले आहे. या गंभीर बाबीमुळे माविमच्या प्रकल्पांना मोठी खिळ बसली असून, या सर्व गैरप्रकाराला व्यवस्थापक अमित बानकर हेच वैयक्तिकरित्या जबाबदार असल्याचा ठपका पत्रात ठेवण्यात आला आहे. तसेच, ज्या महिलांनी अतिरिक्त रक्कम दिली आहे, ती रक्कम व्यवस्थापकांनी संबंधित कंपनीकडून परत घेऊन महिलांना त्वरित परत करावी, असे आदेश दिले आहेत. या भ्रष्टाचारी कारभारामुळे संतप्त झालेल्या बचत गटातील महिलांनी अमित बानकर यांना व्यवस्थापक पदावरून तात्काळ बरखास्त करण्याची मागणी लावून धरली आहे. बानकर यांनी यापूर्वीही असे अनेक गैरप्रकार केले असण्याची शक्यता वर्तवली जात असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

अधिकाऱ्यांची सूचक शांतता

या संपूर्ण प्रकरणावर ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी (DCO) प्रदीप काठोळे आणि सावित्री लोकसंचालित साधन केंद्र वरोराच्या अध्यक्षा अनिता पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दोघांकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अधिकाऱ्यांच्या या शांततेमुळे संशयाचे धुके अधिक गडद झाले असून, वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!