सव्वादोन लाखांच्या मालासह महिला आरोपीवर गुन्हा दाखल
चंद्रपूर शहर पोलिसांची धडक कारवाई
४५ किलो हुक्का तंबाखू जप्त
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर चंद्रपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बाबूपेठ परिसरातील एका घरावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ४५ किलो वजनाचा तब्बल २ लाख ५६ हजार ५०० रुपये किमतीचा हुक्का आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सोनवणे हे आपल्या डी. बी. पथकासह परिसरात गस्त घालत होते. पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना खात्रीशीर बातमीदाराकडून माहिती मिळाली की, बाबूपेठ येथील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर राहणारा लक्ष्मीकांत साटोने हा आपल्या घरी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा करून आहे.
घरातून ९०० टिनाचे डबे जप्त
माहिती मिळताच पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन संबंधित घरावर धाड टाकली. यावेळी घरात हजर असलेली महिला आरोपी शीतल लक्ष्मीकांत साटोने हिच्या उपस्थितीत घराची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान पोलिसांना घरात ‘हुक्का शिशा तंबाखू मजा १०८’ या सुगंधित तंबाखूचे एकूण ९० मोठे खोके आढळून आले. प्रत्येक खोक्यात ५० ग्रॅम वजनाचे १० डबे, असा एकूण ९०० टिनाचे डबे भरलेला साठा पोलिसांनी जप्त केला. या संपूर्ण साठ्याचे वजन ४५ किलो असून त्याची बाजारपेठेत किंमत २ लाख ५६ हजार ५०० रुपये आहे. सर्व प्रतिबंधित साठा जप्त करून पोलिसांनी चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्रमांक ६३२/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या कारवाईबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) चंद्रपूरच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तातडीने माहिती दिली असून, त्यांच्या सहकार्याने पुढील तपास सुरू केला आहे.
यांनी केली कारवाई
सदर कारवाई चंद्रपूर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते, विलास निकोडे, भावना रामटेके व सचिन यांनी केली आहे.


