वरोरा : संजय गांधी निराधार योजना आणि इतर केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी वरोरा व भद्रावती तहसील कार्यालयाकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक सूचना जारी करण्यात आली आहे. या योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी आपले हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) आता अनिवार्यपणे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे.
. शासनाने प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थ्यांचा त्रास वाचवण्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन प्रमाणपत्र देण्याची जुनी प्रक्रिया आता पूर्णपणे बंद केली आहे.
येथे करा ऑनलाईन नोंदणी : लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या सी.एस.सी (C.S.C) केंद्र, महाऑनलाईन केंद्र किंवा सेतू सेवा केंद्रावर जाऊन आपले हयात प्रमाणपत्र ऑनलाईन करून घ्यावे.
कार्यालयात येण्याची गरज नाही : ऑनलाईन सिस्टीमवर नोंदणी झाल्यानंतर त्याची डेटाबेसमध्ये आपोआप नोंद होते. त्यामुळे लाभार्थ्यांनी ऑनलाईन केलेल्या प्रमाणपत्राची प्रत वरोरा किंवा भद्रावती तहसील कार्यालयात नेऊन देण्याची अजिबात आवश्यकता नाही.
वेळेची आणि पैशांची बचत : या नवीन सुविधेमुळे वृद्ध, दिव्यांग आणि गरजू लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागणार नाहीत.
. “ऑनलाईन सिस्टीमवर हयात असल्याची नोंद झाल्यानंतर पुन्हा तहसीलमध्ये वेगळी नोंद करण्याचे काम नसते. त्यामुळे कोणत्याही लाभार्थ्याने कार्यालयात गर्दी करू नये,” असे आवाहन तहसीलदार, वरोरा यांच्या वतीने आदेशान्वये करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी वेळेत आपले डिजिटल हयात प्रमाणपत्र ऑनलाईन करून घ्यावे, जेणेकरून योजनेचा लाभ विनाअडथळा सुरू राहील.


