ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे तहसीलदार राजेश भांडारकर यांच्यामार्फत शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन
भद्रावती : प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये बालभारती आणि एन.सी.इ.आर.टी. (NCERT) प्रकाशनाचीच पुस्तके बंधनकारक करावीत, या मागणीचे पत्र ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती शाखेने तहसीलदार राजेश भांडारकर यांच्यामार्फत शालेय शिक्षणमंत्र्यांना पाठविले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे.
खाजगी शाळांचा अवाजवी नफेखोरी आणि गोरखधंदा
सध्या खाजगी शाळांमध्ये शालेय साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहेत, त्याच शाळेतून पुस्तके खरेदी करणे त्यांच्यावर बंधनकारक केले जात आहे. ही पुस्तके विशिष्ट प्रकाशनाची असून ती बाहेरील खुल्या बाजारात उपलब्ध नसतात. पुस्तकांवर छापलेली किंमत (MRP) अत्यंत अवाजवी असल्याने खाजगी शाळा यातून मोठी कमाई करत आहेत. शिक्षणाच्या नावाखाली पुस्तके विक्रीचा मोठा गोरखधंदा खाजगी शाळांनी सुरू केला असून, या महागड्या पुस्तकांमुळे पालकांवर प्रचंड आर्थिक भार पडत आहे.
खुला बाजार आणि स्वस्त पुस्तकांची मागणी
या लुटीवर ठोस उपाययोजना म्हणून, स्टेट बोर्डाची मान्यता असलेल्या सर्व खाजगी शाळांना ‘बालभारती’ची पुस्तके आणि सीबीएसई (CBSE) मान्यताप्राप्त शाळांना ‘एन.सी.इ.आर.टी.’ची पुस्तके व अभ्यासक्रम बंधनकारक करावा, अशी मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे. असे केल्यास दोन्ही बोर्डांच्या विद्यार्थ्यांना पुस्तके बाजारात सहज उपलब्ध होतील. परिणामी, शाळांमधील पुस्तकांची दुकाने बंद होऊन पालकांना स्वस्त दरात पुस्तके मिळतील आणि त्यांची आर्थिक ओढाताण थांबेल.
. निवेदन देताना ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर, भारत खोब्रागडे, विनोद ठमके, सोनल वावरे, गुरुदेव बावणे, नामदेव रामटेके आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


