Home सामाजिक शेतकऱ्यांसाठी दररोज ३० लिटर राखीव डिझेल कोट्याला मंजुरी !

शेतकऱ्यांसाठी दररोज ३० लिटर राखीव डिझेल कोट्याला मंजुरी !

9

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

आ. मुनगंटीवार यांच्या पत्रानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना स्पष्ट निर्देश

खरीप हंगामाच्या तोंडावर काळाबाजार रोखत शेतकऱ्यांना मोठा आधार

चंद्रपूर : खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना डिझेल टंचाईचा सामना करावा लागू नये, शेतीची कामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष प्रशासनापर्यंत पोहोचवत त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आ. मुनगंटीवार यांनी स्वतंत्र राखीव डिझेल कोटा निश्चित करण्याची मागणी केली होती. या मागणीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना शेतकऱ्यांना ओळखपत्राच्या आधारे दररोज ३० लिटर डिझेल उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश जारी केले आहेत.

ओळखपत्र आणि सातबारा दाखवून मिळणार डिझेल

सध्या जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू असून शेतकऱ्यांना नांगरणी, पेरणी, मशागत आणि इतर शेतीच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता भासत आहे. या आदेशानुसार शेतकऱ्यांनी आपले ओळखपत्र, सातबारा (७/१२ उतारा), फार्मर आयडी किंवा वाहनाचे आरसी बुक (RC Book) यांपैकी आवश्यक कागदपत्रे दाखविल्यानंतर त्यांना दररोज ३० लिटरपर्यंत डिझेल देण्यात येणार आहे.

साठेबाजी आणि काळाबाजाराला लगाम; पंपांवर माहिती फलक बंधनकारक

अनेक ठिकाणी डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण होणे, साठेबाजी किंवा अधिक दराने विक्री होण्याच्या तक्रारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आल्या होत्या. त्यावर तातडीने उपाययोजना म्हणून आता पेट्रोल पंपांवर उपलब्ध साठा, दररोज होणारी विक्री आणि प्राप्त होणारा नवीन साठा याची माहिती दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. काळाबाजार आणि कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी प्रशासनाकडून पंपांची नियमित तपासणी करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी लोकसेवा”

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत प्रशासनाला संवेदनशील निर्णय घेण्यास भाग पाडणारे नेतृत्व म्हणून आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाहिले जाते. या निर्णयावर बोलताना, “शेतकरी अडचणीत असताना शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी लोकसेवा,” अशी भूमिका त्यांनी मांडली. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामीण भागातून अत्यंत समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!