गोतस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई होणार – जिल्हाधिकारी वसुमना पंत
जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीत चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
अनधिकृत कत्तलखाने आणि अवैध वाहतुकीवर रोख
चंद्रपूर : “पशुधन ही आपली संपत्ती असून त्यांचे संगोपन व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी राज्यातील प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० चे काटेकोरपणे पालन करून शासनाने निर्धारित केलेल्या अटी व शर्तींची ग्रामस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करावी,” असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत.
. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे, सहाय्यक आयुक्त डॉ. हरिहर वरठी, सहायक वनसंरक्षक विकास तरसे, गणेश येळणे आणि पोलिस उपनिरीक्षक सुनील गौरकार प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे यांनी गठित समितीची उद्दिष्टे, कार्य व कार्यपद्धतीबाबत सविस्तर माहिती दिली.
मार्गदर्शक सूचना व कडक अंमलबजावणी
आगामी बकर ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे कराव्यात, असे जिल्हाधिकारी पंत यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल व अनधिकृत कत्तलखाने रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या परिपत्रकानुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ व प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० ची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संयुक्त पथके आणि ‘मकोका’ अंतर्गत कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांनी अनधिकृत कत्तलखान्यांवर थेट कारवाई करणे, अवैध जनावर वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करणे, संयुक्त भरारी पथके स्थापन करणे आणि सीमावर्ती भागात संयुक्त तपासणी चौक्या उभारण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. विशेष म्हणजे, संघटित पद्धतीने होणाऱ्या गोतस्करी प्रकरणांमध्ये थेट ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
तात्काळ मदत आणि बैलगाडी शर्यतींचे नियम
प्राणी क्रूरते संदर्भात ‘डायल ११२’ या हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. बकर ईद दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखून तरतुदींचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच, जिल्हाभरात आयोजित करण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतींसाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे कायदेशीररीत्या बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी शेवटी स्पष्ट केले.


