आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्री, राजशिष्टाचार मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीचे औचित्य
शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून राष्ट्रभावनेचा सन्मान करावा
चंद्रपूर : २८ मे रोजी देशभरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी होत असताना, त्यांच्या राष्ट्रनिष्ठ कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. दिनांक ५ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र विधानसभेत त्यांनी सावरकरांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी उपाधीने मरणोत्तर सन्मानित करण्यासाठी एक अशासकीय ठराव मांडला होता. त्यावेळी संबंधित विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांनी राज्य शासनाच्या वतीने शासकीय ठराव पारित करून तो केंद्र शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याची खंत व्यक्त करत, मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि राजशिष्टाचार मंत्री यांना पत्र लिहून येत्या पावसाळी अधिवेशनात हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
परदेशातील क्रांती आणि अंदमानातील अमानुष छळ
विधानसभेत ठराव मांडताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या थोर कार्याचा सविस्तर आढावा घेतला होता. सावरकरांचे संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्रीय विचारांच्या प्रसारासाठी समर्पित होते. इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांतीची प्रेरणा देणाऱ्या अग्रगण्य क्रांतिकारकांमध्ये त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी ‘अभिनव भारत’ सारख्या संघटनांद्वारे स्वातंत्र्यलढ्याला वैचारिक आणि संघटनात्मक बळ दिले. लंडनमध्ये राहून ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध क्रांतिकारी विचारांची बीजे पेरण्याचे धाडस त्यांनी केले. त्यानंतर झालेली अटक, मार्सेल्स येथे जहाजातून घेतलेली ऐतिहासिक उडी आणि अंदमानच्या सेल्युलर कारागृहात भोगलेली अमानुष शिक्षा हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी पण तितकाच प्रेरणादायी अध्याय असल्याचे मुनगंटीवार यांनी अधोरेखित केले.
सामाजिक समता आणि विज्ञाननिष्ठ विचार
सावरकरांनी केवळ राजकीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही, तर त्यांनी भारतीय समाजमनात राष्ट्रभक्तीची ज्योत चेतविण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्यांच्या लेखणीतून आणि भाषणातून प्रकट झालेला राष्ट्रवाद आजही तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. सावरकरांनी सामाजिक समतेसाठीही मोठे कार्य केले. अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक ऐक्य आणि विज्ञाननिष्ठ विचार यांचा पुरस्कार करत त्यांनी समाजसुधारणेची मोठी चळवळ उभी केली. त्यांच्या विचारांमधून देशप्रेम, आत्मविश्वास, त्याग आणि राष्ट्रहिताची भावना दृढ होत असून, राष्ट्रहित सर्वोच्च मानणारे त्यांचे जीवन आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
जनतेमध्ये नाराजी; मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या कारवाईचे आवाहन
मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नसल्यामुळे सावरकर प्रेमी जनतेमध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण होत असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. उद्याच्या सावरकर जयंतीचे औचित्य साधून त्यांनी राज्य शासनाला आवाहन केले आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा आणि बलिदानाचा गौरव करणारा शासकीय ठराव येत्या पावसाळी अधिवेशनात तातडीने मांडून पारित करावा व केंद्र शासनाकडे पाठवावा. “सावरकरांचे विचार हे राष्ट्राला प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या कार्याचा योग्य तो राष्ट्रीय सन्मान होणे ही केवळ औपचारिकता नसून प्रत्येक देशभक्त भारतीयाची भावना आहे,” असे सांगत शासनाने आपल्या आश्वासनाची पूर्तता करून राष्ट्रभावनेचा सन्मान करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


