Home सामाजिक ६०० कोटींच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत व मशनरी धुळखात पडू देणार नाही

६०० कोटींच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत व मशनरी धुळखात पडू देणार नाही

1

पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत १० ट्युबवेल खोदून महाविद्यालय टप्प्याटप्प्याने सुरू करा

खासदार प्रतिभा धानोरकर यांचे प्रशासनाला निर्देश

सुरक्षिततेसाठी पोलीस चौकी आणि रुग्णांसाठी बस सेवा सुरू करण्याचीही मागणी

चंद्रपूर : ६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून चंद्रपूर येथे दिमाखात उभे राहिलेले नवीन कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत बंद ठेवणे अत्यंत अयोग्य आहे. या दिरंगाईमुळे येथे आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित मशनरी आणि कोट्यवधी रुपयांच्या इमारती बंद अवस्थेत खराब होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पाणी प्रश्न पूर्णपणे सुटायला अजून एक ते दीड वर्ष लागू शकते; परंतु तोपर्यंत हातवर हात धरून वाट न पाहता तातडीने १० ट्युबवेल खोदून हे महाविद्यालय टप्प्याटप्प्याने सुरू करावे, अशा लोकहितकारी सूचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्या. कॉलेज परिसराचा सविस्तर पाहणी दौरा करून त्यांनी प्रशासनाला हे खडे बोल सुनावले. हे महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास चंद्रपूर शहरातील जुन्या शासकीय महाविद्यालयावरील रुग्णांचा प्रचंड ताण कमी होईल, चंद्रपूरच्या वैद्यकीय व्यवस्थेत मोठी भर पडेल, तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार वैद्यकीय शिक्षण घेणे सोयीचे होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकीची मागणी
या पाहणी दौऱ्यादरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी परिसरातील इतरही अनेक गंभीर समस्यांवर अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. नवीन मेडिकल कॉलेजच्या परिसरात काही टवाळखोर युवक नशा करून महिलांची छेड काढत असल्याचे निदर्शनास आले आहे. भविष्यात या परिसरात गुन्हेगारीचे हे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने, येथे तातडीने पोलीस चौकी स्थापन करून पोलिसांचे पेट्रोलिंग वाढविण्यात यावे, जेणेकरून महिला व विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळेल, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

रुग्णांच्या सोयीसाठी बस फेऱ्या सुरू करण्याची सूचना
हे महाविद्यालय व कॅन्सर हॉस्पिटल शहरापासून काहीसे दूर असल्याने येथे येण्यासाठी सामान्य रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा त्रास कायमचा दूर करण्यासाठी या परिसरात त्वरित अधिकृत बस थांबा देण्यात यावा आणि सकाळी २ वेळा, दुपारी १ वेळ व सायंकाळी २ वेळा बस फेऱ्या सुरू करण्यात याव्यात, जेणेकरून गोरगरीब रुग्णांची वाहतुकीची मोठी सोय होईल, अशी आग्रही सूचना खासदार धानोरकर यांनी केली.

प्रमुख लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्याप्रसंगी कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष शिवा राव, महिला व बालकल्याण सभापती संगीता भोयर, झोन ३ सभापती रामनरेश यादव, ए. आय. पी. सी. जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेवक सुरेंद्र अडबाले, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक अजय बल्की, नगरसेवक राहुल चौधरी, नगरसेविका सुनंदा धोबे, नगरसेविका वैशाली महाडोळे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार, निसार शेख, प्रतिभा पेंदाम, स्वप्नील कांबळे, शहजाद शेख, अतुल वाघमारे, आशिष बोन्डे, अतुल पिंपळकर, प्रवीण अधिकारी, गुंजन येरमे, राज यादव, मोनू रामटेके, अनिल सुरपाम यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!