भद्रावती तालुक्यात कामासाठी गेला असताना आली चक्कर
चंद्रपुरात उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील एका ३२ वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहूल विठ्ठल दानव (रा. साईबाबा वॉर्ड, विसापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तापमानाने उच्चांक गाठला असून, या कडक उन्हाचा बळी राहुल ठरल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पानटपरीवर आली भोवळ
राहुल दानव हा २५ मे रोजी घरगुती आणि वडिलोपार्जित शेतीच्या कामासाठी भद्रावती तालुक्यातील पावना या गावी गेला होता. काम आटोपून तो विसापूर येथे परतणार होता. मात्र, दुपारच्या सुमारास गावातील एका पानटपरीवर उभा असताना त्याला अचानक चक्कर (भोवळ) आली. तो थेट डोक्याच्या भारावर जमिनीवर पडला.
उपचार ठरले अपयशी
डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला तातडीने चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया (सर्जरी) करून वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
गावावर शोककळा
गुरुवार, २८ मे रोजी दुपारी १२ वाजता विसापूर येथील स्मशानभूमीत राहुलवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, भाऊ, वहिनी असा मोठा आप्तपरिवार आहे. आईचा मुख्य आधार असलेल्या राहुलच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण विसापूर गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.


