वर्धा रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल
भुसावळला जाण्यासाठी निघाल्या होत्या आशाताई बरडे
भद्रावती : चंद्रपूर रेल्वे स्थानक परिसरातून एक ६५ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वर्धा येथील रेल्वे पोलीस ठाण्यात मिसिंगची (बेपत्ता) नोंद करण्यात आली असून पोलीस महिलेचा कसून शोध घेत आहेत.
चुकीच्या गाडीत बसल्याची शक्यता
आशाताई तुळशिराम बरडे (वय ६५, रा. येरूर, पो. तडाळी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. त्या १८ मे रोजी सकाळी भुसावळ येथे राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी चंद्रपूर रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. स्थानकावरून ओखा-पुरी एक्सप्रेस सुटून गेल्यानंतर, त्या दुसऱ्या रेल्वेची प्रतीक्षा करत होत्या. यादरम्यान त्या चुकून दुसऱ्या एखाद्या गाडीत बसल्या असाव्यात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
नातेवाईकांचा शोध निष्फळ
महिलेशी संपर्क साधण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आणि सर्व संभाव्य ठिकाणी शोध घेऊनही त्या मिळून न आल्याने, अखेर नातेवाईक शितल सतिश गोवरदिवे यांनी वर्धा रेल्वे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी मिसिंग क्रमांक ०७/२०२६ अन्वये नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
बेपत्ता महिलेचे वर्णन
बेपत्ता झालेल्या आशाताई बरडे यांचे वय अंदाजे ६५ वर्षे असून त्यांचा रंग गोरा आणि उंची सुमारे ५ फूट आहे. त्यांचे केस काळे असून ते डाय केलेले आहेत. त्यांनी अंगावर साडी परिधान केलेली असून त्यांच्या डाव्या हाताजवळ ऑपरेशनची एक जखम आहे. तसेच त्यांच्याजवळ एक हँडबॅग असून त्यात काही सोन्याचे दागिने असल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
संपर्क करण्याचे आवाहन
या वर्णनाची महिला कुठेही आढळून आल्यास किंवा त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास, तातडीने जवळच्या रेल्वे पोलीस ठाण्याशी किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या 9850050842 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस आणि नातेवाईकांनी केले आहे.


