Home सामाजिक रहमत नगर परिसरातील इरई नदीच्या संरक्षणासाठी आ. सुधीर मुनगंटीवार मैदानात

रहमत नगर परिसरातील इरई नदीच्या संरक्षणासाठी आ. सुधीर मुनगंटीवार मैदानात

19

रामसेतू ते चौराळा पुलापर्यंत संरक्षक भिंतीच्या उभारणीसाठी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी

तातडीने अंदाजपत्रक तयार करून आवश्यक निधी देण्याची आ. मुनगंटीवार यांची ग्वाही

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील इरई नदी परिसराच्या संरक्षणासाठी आणि नागरिकांना भविष्यातील पूरस्थिती व संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित करण्यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे पाऊल उचलले आहे. रहमत नगर येथील इरई नदी परिसराची त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. पहिल्या टप्प्यात रामसेतूपासून ते चौराळा पुलापर्यंत पक्की संरक्षक भिंत उभारण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नदीकाठावरील धोक्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

.       या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक (इस्टिमेट) तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच संरक्षक भिंतीचा प्रस्तावित मार्ग व बांधकामाची व्याप्ती निश्चित करून, त्याबाबत संबंधित विभागाच्या अभियंत्यांसोबत सखोल चर्चा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

.       नदीच्या सकल (सखल) भागामध्ये माती भरण्याचे काम तसेच सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत तयार करण्यात यावे, असे सांगत या महत्त्वपूर्ण कामासाठी आवश्यक तो सर्व निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. या नियोजनामुळे इरई नदी परिसराच्या दीर्घकालीन संरक्षणाला मोठी गती मिळणार आहे.

प्रमुख लोकप्रतिनिधी व नागरिकांची उपस्थिती

या महत्त्वाच्या पाहणीदरम्यान चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती अध्यक्षा मनस्वी गिरे, नगरसेवक रवी लोणकर, नगरसेवक प्रज्वलंत कडू, नगरसेवक अजहर शेख, नगरसेवक राहुल पावडे, तसेच राजीव गोलीवार, डॉ. मंगेश गुलवाडे, चांद सय्यद, ब्रिजभूषण पाझारे, सुरज पेदुलवार यांच्यासह रहमत नगर परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासात्मक दूरदृष्टी

चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार सातत्याने आग्रही राहिले आहेत. शहराच्या वाढत्या गरजा, नागरिकांची सुरक्षितता आणि भविष्यातील नियोजन लक्षात घेऊन पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे. विकासाच्या प्रत्येक विषयाकडे केवळ एक काम म्हणून नव्हे, तर चंद्रपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठीची जबाबदारी म्हणून पाहत त्यांनी या प्रकल्पाला गती दिली आहे.

error: Content is protected !!