वृद्धाश्रमाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन, १० हजारांची देणगी
वृक्षारोपण व मान्यवरांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकीचा संदेश
वरोरा : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती, वरोराच्या वतीने महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वरोरा शहरात अहिल्यादेवी जयंती दरवर्षीप्रमाणेच मोठ्या उत्साहात साजरी होत राहील, असा संकल्प आयोजकांनी या प्रसंगी सोडला.
मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन
या मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजभूषण गणपतराव चिडे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन वरोरा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रफुल्ल खुजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्र प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून चिमूर येथील ग्रामगीता विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक युवराज बोधे आणि धनगर अधिकारी कर्मचारी संघटना तालुका शाखा, वरोरा चे अध्यक्ष कमलाकर पडवे उपस्थित होते. तसेच वरोराचे उपविभागीय अभियंता खराटे यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
मान्यवरांचा सत्कार व गुणवंतांचा गौरव
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यामध्ये विद्या प्रकाश गिलबिले (खरवडे) आणि ज्येष्ठ समाजभूषण गणपतराव चिडे यांचा उत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाला नेहमी तन-मन-धनाने सहकार्य करणारे संजय बोधे आणि संगीता संजय बोधे यांचा अहिल्यादेवी होळकर वृद्धाश्रमाच्या संचालिका सोनुबाई येवले यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. याच मंचावरून समाजातील प्रज्ञावंत व गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
वृद्धाश्रमाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन व देणगी
कार्यक्रमादरम्यान शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनी वेळेवर उपस्थिती दर्शवून अहिल्यादेवी होळकर वृद्धाश्रमाच्या नूतन प्रवेशद्वाराचे उद्घाटन केले. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळील जागेचे सुशोभीकरण करण्यासाठी त्यांनी वृद्धाश्रमाला १०,००० रुपयांची आर्थिक देणगी दिली. जयंतीचे औचित्य साधून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश जपत वृद्धाश्रम परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन व आभार
या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके संचालन रवींद्र गावंडे यांनी केले, तर अमोल नवघरे यांनी प्रास्ताविक सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे धडाडीचे कार्यकर्ते इंजिनीयर गणेश चिडे, राकेश टापरे, अरुण चिडे, अजिंक्य काळे, महेश लोंढे, अमोल नवघरे, अतुल येवले, रवींद्र गावंडे तसेच कुसुम वैद्य येवले आणि छाया धवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी अतुल येवले यांनी उपस्थित सर्व बंधू-भगिनी तसेच मार्गदर्शक मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.


