नंदोरीचा शुभम शिवरकर भारतीय सैन्यात दाखल !
मजुरी करत पूर्ण केले स्वप्न
भद्रावती तालुक्यातील नंदोरी गावाचा वाढवला मान
चंद्रपूर : “सध्याच्या युगात नोकऱ्या नाहीत आणि बेरोजगारी वाढली आहे,” अशी नकारात्मक ओरड करणाऱ्या तरुणांसमोर भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील शुभम नंदकिशोर शिवरकर या युवकाने एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मिस्त्री आणि डेकोरेशन चे काम करत, शुभमने आपल्या अथांग जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर थेट ‘भारतीय सैन्यात’ (Indian Army) झेप घेतली आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून सोशल मीडियावर अभिनंदनाचा जोरदार वर्षाव होत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुरू झाला प्रवास
शुभम हा लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कष्टाळू विद्यार्थी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण नंदोरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर त्याने आपले १० वी आणि १२ वीचे शिक्षण वरोरा येथील हिरालाल लोया विद्यालय तथा महाविद्यालयातून पूर्ण केले. १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचे ध्येय स्पष्ट होते; देशसेवेसाठी सैन्यात भरती व्हायचे किंवा खाकी वर्दी अंगावर चढवायची.
स्वतः कमावले, स्वतः शिकला !
शुभमच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील सिक्युरिटी गार्ड म्हणून रात्रं-दिवस पहारा देतात, आई दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करते, तर मोठा भाऊ कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मिस्त्रीचे काम करतो. अशा परिस्थितीत घरच्यांवर आपल्या शिक्षणाचा भार पडू नये म्हणून शुभमने स्वतः मिस्त्री आणि डेकोरेशनच्या कामावर जाण्यास सुरुवात केली. दिवसा कामाचा घाम गाळायचा आणि रात्री स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा, असा त्याचा नित्यक्रम होता.
भावाचे अपूर्ण स्वप्न धाकट्याने केले पूर्ण
नंदोरी गावातील तरुणाने भारतीय सैन्यात दाखल व्हावे, असे स्वप्न शुभमचा मोठा भाऊ निखिल शिवरकर आणि मित्र अजित पुसनाके यांनी पाहिले होते. यासाठी निखिल शिवरकर याने स्वतः सैन्य भरतीचे अनेक प्रयत्न केले. मात्र, सर्व टप्पे पार केल्यानंतर दुर्दैवाने तो मेडिकल राउंडमध्ये बाद झाला. स्वतःचे स्वप्न तुटले तरी निखिल खचला नाही. त्याने आपले तेच स्वप्न लहान भाऊ शुभमच्या डोळ्यात पेरले. निखिलचे अपूर्ण राहिलेले तेच स्वप्न आज शुभमने सत्यात उतरवून दाखवले आहे.
भाऊ आणि मेहुण्याने दाखवली यशाची दिशा
सैन्य भरती आणि पोलीस भरती अत्यंत खडतर असते. यासाठी शुभमला त्याचा मोठा भाऊ निखिल शिवरकर आणि मेहुणे रोहित बयक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या दोघांनी शुभमला प्रत्येक टप्प्यावर खंबीर साथ दिली, त्याचा सराव करून घेतला आणि कोणत्याही परिस्थितीत त्याचा आत्मविश्वास तुटू दिला नाही. शुभमच्या या यशामुळे त्याच्या मित्रपरिवारात आणि संपूर्ण तालुक्यात प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
“माझे आई-वडील आणि भाऊ हीच माझी ताकद!
“आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना शुभम शिवरकर म्हणाला, “घरची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. या गरिबीच्या गर्तेतून कुटुंबाला बाहेर काढणे अत्यंत गरजेचे होते. माझ्या आई-वडिलांचे स्वप्न होते की मी लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि स्वतःचे नाव कमवावे. म्हणूनच मी सैन्य दल आणि पोलीस भरतीची तयारी एकाच वेळी सुरू ठेवली होती. आज भारतीय सैन्यात निवड झाल्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि हे यश मी माझ्या कष्टाळू आई-वडील, भाऊ निखिल, मेहुणे रोहित आणि मित्रांना समर्पित करतो.”


