Home सामाजिक स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात साकारतोय

स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात साकारतोय

17

ऊर्जानगर येथील मन की बात कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मन की बातमधून घडते सकारात्मक परिवर्तन

पुष्पगुच्छांऐवजी ‘पुस्तक भेटी’चा आग्रह धरत अधोरेखित केले शिस्त आणि संस्कारांचे महत्त्व

चंद्रपूर : “स्वामी विवेकानंदांनी भारताला आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती आणि विश्वगुरू होण्याचे स्वप्न दिले. त्यांच्या विचारांनी देशातील युवकांना राष्ट्रनिर्मितीची दिशा दिली. आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात त्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर होताना दिसत आहे. आत्मनिर्भर भारत, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रतिष्ठा यांमधून विकसित भारताचे स्वप्न साकार होत आहे. स्वामी विवेकानंदांनी भारताच्या मनात स्वप्नांची ज्योत प्रज्वलित केली, तर देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्या स्वप्नांना विकास आणि प्रगतीचे पंख दिले आहेत,” असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

.        डब्ल्यूआरसी (WRC) क्लब, ऊर्जानगर येथे आयोजित ‘मन की बात आम जनता के साथ’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपा नेते रामपाल सिंग, श्रीनिवास जंगम, माजी नगरसेवक अजय सरकार, हनुमान काकडे, रोशनी खान, विलास टेंभुर्णे, मारुती पिंपळशेंडे, संतोष ताजणे, मनोज मानकर, माला रामटेके यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरुण शक्ती आणि राष्ट्र परिवर्तन
स्वामी विवेकानंदांनी देशातील तरुण शक्तीवर व्यक्त केलेला विश्वास अधोरेखित करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, राष्ट्र परिवर्तनासाठी केवळ संख्याबळ नव्हे तर योग्य दिशा, विचार आणि कृतीची आवश्यकता असते. स्वामी विवेकानंदांनी ज्या सक्षम, राष्ट्रभक्त युवकांची अपेक्षा व्यक्त केली होती, त्या विचारांचे प्रतिबिंब आज विकसित भारताच्या संकल्पनेत दिसून येते.

‘मन की बात’मधून घडते सकारात्मक परिवर्तन
‘मन की बात’ हा केवळ कार्यक्रम नसून समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा, प्रेरणा देणारा आणि जनतेला राष्ट्रनिर्मितीच्या कार्याशी जोडणारा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या या उपक्रमातून देशभरातील प्रेरणादायी कार्यकर्ते, नवकल्पना आणि सामाजिक बदल घडविणाऱ्या व्यक्तींची माहिती जनतेपर्यंत पोहोचते. या प्रेरणेचा वैयक्तिक जीवनात उपयोग करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी एकाग्रता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांवर भर दिला. पर्यावरण संवर्धन, वाचन संस्कृतीचा प्रसार, सार्वजनिक ठिकाणी शिस्तबद्ध वर्तन आणि सामाजिक सहभाग या माध्यमातून प्रत्येक नागरिक राष्ट्रनिर्मितीत योगदान देऊ शकतो, असे ते म्हणाले.

पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक भेट: वैचारिक प्रगल्भतेचा आग्रह
यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी समाजात वाचन संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी कार्यक्रमांमध्ये पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक भेट देण्याची प्रेरणादायी भूमिका मांडली. पुस्तके ही केवळ ज्ञानाची साधने नसून विचारांना दिशा देणारी आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारी अमूल्य संपत्ती असल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तकांच्या माध्यमातून समाजात ज्ञानाची देवाणघेवाण वाढून वैचारिक प्रगल्भता निर्माण होते, असे ते म्हणाले. तसेच सार्वजनिक जीवनात शिस्त, वेळेचे भान आणि सकारात्मक सवयी यांचे महत्त्व अधोरेखित करताना, छोट्या-छोट्या कृती आणि सवयींमधूनच मोठे संस्कार घडत असतात, असे प्रतिपादन त्यांनी केले.

३ ऑक्टोबरला भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करताना आ. मुनगंटीवार यांनी आगामी ३ ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’च्या वर्धापन दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर जनसहभागातून विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले. प्रत्येक बूथ स्तरावरून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन राष्ट्रनिर्मितीच्या या अभियानाला बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

error: Content is protected !!