Home सामाजिक चंद्रपूर जिल्ह्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

चंद्रपूर जिल्ह्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

7

पाच घरांना दिली भेट

नागरिकांना वास्तविक माहिती देण्याचे आवाहन

१ फेब्रुवारी २०२७ पासून होणार प्रत्यक्ष लोकसंख्या गणना

चंद्रपूर : प्रशासनाकडून सध्या चंद्रपूर जिल्ह्यात जनगणनेचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. या प्रक्रियेत प्रगणक आणि पर्यवेक्षक घरोघरी जाऊन कुटुंब आणि नागरिकांची सविस्तर माहिती घेत आहेत. या राष्ट्रीय कामाची प्रगती जाणून घेण्यासाठी आणि फिल्डवर काम करताना कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी चंद्रपूर तालुक्यातील ‘छोटा नागपूर’ या गावाला अचानक भेट दिली. सन २०११ च्या जनगणनेनंतर तब्बल १५ वर्षांनी ही जनगणना करण्यात येत असल्याने प्रशासनाकडून या कामाला विशेष महत्त्व दिले जात आहे.

पहिल्या टप्प्यात भौतिक सुविधा आणि मालमत्तेची नोंदणी

सध्या जनगणनेचा पहिला टप्पा सुरू असून, यामध्ये प्रामुख्याने घर, कुटुंबातील भौतिक सुविधा आणि मालमत्तेशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न नागरिकांना विचारले जात आहेत. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रत्यक्ष घरी भेट देऊन हे काम केले जात आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी छोटा नागपूर गावातील पाच घरांना प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि प्रगणकांमार्फत सुरू असलेली जनगणना अचूक होत आहे का, याची स्वतः पडताळणी केली. यावेळी त्यांनी प्रगणक आणि पर्यवेक्षकांना कामात काही अडचणी येत आहेत का, याची विचारणा केली असता, क्षेत्रीय स्तरावर कोणतीही अडचण येत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

स्व-गणना केलेल्यांसाठी ‘युनिक आयडी’ तर इतरांसाठी डिजिटल नोंदणी

या जनगणनेत प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत www.se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. ज्या नागरिकांनी या कालावधीत स्वतःहून ऑनलाईन माहिती भरली आहे, त्यांचा एक विशिष्ट ‘युनिक आयडी’ (Unique ID) तयार झाला आहे. प्रगणक घरी आल्यानंतर अशा नागरिकांनी केवळ आपला ‘युनिक आयडी’ क्रमांक त्यांना सादर करायचा आहे. ज्या नागरिकांनी ऑनलाईन माहिती भरलेली नाही, त्यांची माहिती प्रगणक स्वतः त्यांच्या घरी जाऊन डिजिटल उपकरणांद्वारे सुरक्षितपणे संग्रहित करीत आहेत.

१ फेब्रुवारी २०२७ पासून प्रत्यक्ष लोकसंख्या गणना

घरांची आणि घरात असलेल्या भौतिक सुविधांच्या माहितीचा हा पहिला टप्पा १४ जून २०२६ रोजी संपणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर, संपूर्ण देशात आणि जिल्ह्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करण्याची प्रक्रिया १ फेब्रुवारी २०२७ मध्ये पार पडणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय काम असल्याने जनगणनेच्या कामासाठी घरी येणारे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सर्व नागरिकांनी कसलीही भीती न बाळगता वास्तविक आणि अचूक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पंत यांनी केले आहे.

वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती

जिल्हाधिकाऱ्यांच्या या अत्यंत महत्त्वाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, प्रगणक कैलास कांबळे, पर्यवेक्षक विशाल दुपारे यांच्यासह स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये छोटा नागपूरच्या सरपंच रंजना जुनघरे, उपसरपंच ऋषभ दुपारे, पोलिस पाटील राजकुमार सागवडे, ग्रामसेवक तुषार बागुळे, तलाठी सीमा नगराळे, तसेच किरण अलोणे, रेखा कांबळे आणि इतर ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!