Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा पोलिसांचा अवैध दारूविक्रीवर ‘स्ट्राइक’

वरोरा पोलिसांचा अवैध दारूविक्रीवर ‘स्ट्राइक’

47

तीन ठिकाणच्या धाडीत तिघे जेरबंद !

५६ देशी दारूच्या बाटल्यांसह मोबाईल आणि रोख रक्कम जप्त

वरोरा : वरोरा शहरात व परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्री विरोधात पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली असून, एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मोठ्या कारवाईचा धडाका लावला आहे. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दि. ०९ एप्रिल २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ५६ देशी दारूच्या बाटल्या, मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

पहिली कारवाई: अंबादेवी वार्डात विपिन पाटील जाळ्यात
पोलीस हवालदार अमोल नवघरे, संदीप मुळे, प्रशांत नागोसे व पोलीस अंमलदार मनोज यांच्या पथकाला पेट्रोलिंग दरम्यान माहिती मिळाली की, अंबादेवी वार्डात दारूची अवैध विक्री सुरू आहे. पथकाने पंचांच्या उपस्थितीत धाड टाकली असता, आरोपी विपिन प्रभाकर पाटील (४७) याच्याकडून १७ देशी दारूच्या बाटल्या (किंमत ६८० रुपये) जप्त करण्यात आल्या. त्याच्यावर कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई: सरदार पटेल वार्डातून शंकर देवकरला अटक
दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी सरदार पटेल वार्डात छापा टाकला. येथे अवैध दारू बाळगल्याप्रकरणी शंकर मुकुंद देवकर (२४) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १५ देशी दारूच्या बाटल्या (किंमत ६०० रुपये) जप्त करण्यात आल्या असून दारूबंदी कायद्यान्वये त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

तिसरी कारवाई: मार्डा येथे वर्धा नदीकाठी मोठी जप्ती
तिसरी आणि मोठी कारवाई मार्डा परिसरातील वर्धा नदीकाठी करण्यात आली. पोलीस हवालदार संदीप मुळे यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात अशोक भैय्याजी पंधराम (३९) याला अटक केली. त्याच्याकडून २४ देशी बाटल्या (९६० रुपये), २०० रुपये रोख आणि १२,५०० रुपयांचा मोबाईल असा एकूण १३,६६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्यावरही कलम ६५(ई) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा
वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागात देशी दारूची अवैध विक्री फोफावली असून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, ही दारू नक्की कोणत्या दुकानातून पुरवली जाते, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!