Home सामाजिक चंदनखेडा येथील शासकीय आश्रमशाळेत ‘सामाजिक समता सप्ताहा’चे उत्साहात उद्घाटन

चंदनखेडा येथील शासकीय आश्रमशाळेत ‘सामाजिक समता सप्ताहा’चे उत्साहात उद्घाटन

51

बार्टी पुणेच्या वतीने १४ एप्रिलपर्यंत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

महामानवांच्या विचारांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भद्रावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने ‘सामाजिक समता सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा उद्घाटन सोहळा चंदनखेडा येथील शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेत नुकताच उत्साहात पार पडला. बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ, निबंधक डॉ. सुचिता शिंदे, विभाग प्रमुख जोगदंड आणि चंद्रपूर जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.

.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ८ ते १४ एप्रिल दरम्यान हा सामाजिक समता सप्ताह साजरा केला जात आहे. उद्घाटन प्रसंगी समतादूत गणेश हनवते यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांची माहिती दिली. शिक्षण, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयांवर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. तसेच भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांसह महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा इतिहासही मांडला.

.      यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा करून पथनाट्य सादर केले, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

.      या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून भोयर, सोनवणे, शाळेचे सोनुले आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. १४ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

error: Content is protected !!