Home सामाजिक चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत ॲक्शन मोडवर

चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत ॲक्शन मोडवर

50

जिल्हा सामान्य रुग्णालयाची केली अचानक पाहणी

रुग्णांशी साधला संवाद

निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचाही घेतला आढावा

चंद्रपूर : चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारताच वसुमना पंत यांनी प्रशासकीय कामांचा धडाका लावला आहे. विविध विभागांच्या आढावा बैठकांसोबतच त्यांनी आता प्रत्यक्ष भेटींवर भर दिला असून, शुक्रवारी (दि. १०) त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली.

.      यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, डॉ. निवृत्ती जिवने, प्रभारी तहसीलदार ओंकार ठाकरे आदी उपस्थित होते.

.       जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी रुग्णालयातील स्वच्छतेबाबत कडक निर्देश दिले. “रुग्णालयाचा अंतर्गत आणि बाह्य परिसर नियमित स्वच्छ ठेवावा. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी आणि दर्जेदार कॅन्टीनची व्यवस्था असावी,” अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच, निर्माणाधीन सुलभ शौचालयाचे काम तातडीने पूर्ण करून ते नागरिकांसाठी खुले करण्याचे आदेशही त्यांनी दिले. बाह्य रुग्ण विभागात (OPD) येणाऱ्या रुग्णांच्या सुविधेसाठी बसण्याची पुरेशी व्यवस्था (बेंचेस) करण्याचेही त्यांनी सुचवले.

रुग्णांशी आपुलकीने संवाद
पाहणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. बालरुग्ण विभागात एका मातेची विचारपूस करताना, “बाळाला काय झाले आहे ? बाळ वरचे जेवण घेते का?” अशी आस्थेने चौकशी केली. रुग्णालयातील सीटी स्कॅन सुविधा, सर्पदंश झालेले रुग्ण आणि उपलब्ध बेडची संख्या याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती घेतली. नवजात बालकांची विशेष काळजी घेणाऱ्या डॉक्टर्स आणि स्टाफच्या कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

अधिष्ठात्यांकडून कामकाजाची माहिती
यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी माहिती दिली की, रुग्णालयात दररोज १२ शे ते १५ शे रुग्णांची ओपीडी नोंदणी होते आणि भरती असलेल्या रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो.

विविध वॉर्डला भेट व पाहणी : जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आपात्कालीन कक्ष, सोनोग्राफी व एक्स – रे कक्ष, अतिदक्षता विभाग, बालरुग्ण कक्ष, नवजात बालकांचे अतिदक्षता कक्ष, ऑपरेशन थेटर, पोषण व पुनर्वसन केंद्र, जिल्हा शीघ्र अतिदक्षता कक्षातील मानसिक विकार तपासणी कक्ष, दृष्टीदोष तपासणी कक्ष, भौतिकोपचार विभाग, श्रवणदोष तपासणी कक्ष, ज्ञानेंद्रिय एकात्मिक विकास कक्ष, दंत विभाग आणि नर्सिंग कॉलेजला भेट देऊन पाहणी केली.

निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट : जिल्हाधिकारी पंत यांनी बल्लारपूर मार्गावरील निर्माणाधीन मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा भेट दिली. या नवीन परिसरात कोणकोणते काम प्रलंबित आहे व कोणत्या यंत्रणा सदर काम करीत आहे, याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच महाविद्यालयाच्या प्रलंबित कामांविषयी लवकरच एक आढावा बैठक घेण्यात येईल, जेणेकरून नवीन परिसरात रुग्णालय स्थलांतरीत करणे सोयीचे होईल, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

error: Content is protected !!