Home सामाजिक चंदनखेडा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान’ उत्साहात

चंदनखेडा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान’ उत्साहात

42

जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष

खा. प्रतिभा धानोरकर आणि जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या समस्यांचा निपटारा

महिला बचत गटांच्या कार्याचेही झाले कौतुक.

भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथे शुक्रवारी, १० एप्रिल रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान’ शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यात आली, तसेच महसूल व इतर विभागांशी संबंधित प्रलंबित समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात आले.

.      या महत्त्वपूर्ण शिबिराला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि नवनियुक्त जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबतच उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर, अप्पर जिल्हाधिकारी बालाजी कदम, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, गट शिक्षणाधिकारी प्रकाश महाकाळकर, भुमी अभिलेख उपअधीक्षक कृष्णा पारधी, बालविकास प्रकल्प अधिकारी पुनम गेडाम, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बोदवड, मंडलअधिकारी भोयर, ग्राम महसूल अधिकारी धात्रक आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाचा थेट जनतेच्या दारी पुढाकार
कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि त्यातील लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे.” या शिबिरामुळे नागरिकांना आपल्या कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारण्याची गरज उरली नाही.

बचत गटांच्या स्टॉल्सना भेटी
शिबिरात विविध शासकीय विभाग आणि स्थानिक महिला बचत गटांनी आपले स्टॉल्स लावले होते. खासदार प्रतिभा धानोरकर आणि जिल्हाधिकारी यांनी या सर्व स्टॉल्सना भेट देऊन माहिती घेतली. विशेष म्हणजे, त्यांनी बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत महिलांच्या कौशल्याचे आणि मेहनतीचे भरभरून कौतुक केले.

.     या अभियानाला चंदनखेडा व परिसरातील शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महसूल विभागाच्या या ‘थेट दारी’ उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

error: Content is protected !!