Home चंद्रपुर जिल्हा विशेष गुराख्याची नशा शेतकऱ्यांच्या मुळावर

गुराख्याची नशा शेतकऱ्यांच्या मुळावर

258

विषारी औषध खाल्ल्याने १० दुभत्या म्हशींची प्रकृती चिंताजनक

आसाळा गावात खळबळ

रानडुकरांसाठी शेतात टाकलेले ‘पायझन’ खाल्ल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात

वरोरा : तालुक्यातील दुग्धोत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या आसाळा गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. होळीच्या सणानिमित्त गुराख्याने केलेल्या मद्यपानामुळे १० दुभत्या म्हशींनी कपाशीच्या शेतातील विषारी औषध खाल्ले. यामुळे या सर्व म्हशींची प्रकृती अत्यंत गंभीर असून, हाता तोंडाशी आलेला दुग्धव्यवसायाचा घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले आहेत.

.       मिळालेल्या माहितीनुसार, आसाळा येथील गुराखी नेहमीप्रमाणे गावातील जनावरे चराईसाठी घेऊन गेला होता. मात्र, होळीचा सण असल्याने त्याने मद्यप्राशन केले होते. नशेत असताना तो एका झाडाखाली झोपून गेल्याने जनावरांवरील त्याचे नियंत्रण सुटले. याच संधीचा फायदा घेत जनावरे शेजारील कपाशीच्या शेतात शिरली. रानडुकरे आणि इतर जंगली प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने शेतात विषारी कीटकनाशक (पायझन) टाकून ठेवले होते. चारा चरताना या १० म्हशींच्या पोटात हे विष गेल्याने काही वेळातच त्यांची प्रकृती खालावली.

.       या घटनेत आनंदराव देवगडे (३ म्हशी), रमेश मिलमिले (२ म्हशी), मारोती मगरे (२ म्हशी), भास्कर जांभुळे (१ म्हैस) आणि मधुकर डुकरे (२ म्हशी) अशा एकूण १० दुभत्या म्हशी बाधित झाल्या आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या म्हशी आजारी असल्याने त्यांचे दूध काढणे अशक्य झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन उत्पन्नाचा मार्ग बंद झाला आहे.

.       एकीकडे दूध उत्पादन बंद झाल्याने उत्पन्नाचे संकट, तर दुसरीकडे उपचारांचा मोठा आर्थिक बोजा यामुळे शेतकरी दुहेरी कात्रीत सापडले आहेत. प्रत्येक म्हशीच्या उपचारासाठी साधारणतः २ ते २.५ हजार रुपये खर्च येत असून, दहा म्हशींमागे आतापर्यंत २५ हजार रुपयांचा फटका बसला आहे. “विषबाधेचे प्रमाण जास्त असल्याने म्हशींचा मृत्यू होण्याची भीती आहे,” असे पशुवैद्यकांनी स्पष्ट केले आहे.

.       या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रभावित शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच, जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतात विषारी पदार्थ टाकण्यापेक्षा सौर कुंपण किंवा इतर सुरक्षित पर्यायी उपाय योजण्याची गरजही यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.

error: Content is protected !!