आमदार राजेश बकाने यांनी विधिमंडळात मांडली लक्षवेधी
वाळू तस्करीचा मुद्दा तापला
वरोरा : पुलगाव येथील भाजपा शहर महामंत्री भरत नागपाल यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील तपासाला आता वेग आला असून, वरोरा पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत एकूण ११ आरोपींना ताब्यात घेतले आहे. आज बुधवारी या सर्व आरोपींना वरोरा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले असून देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी लक्षवेधीद्वारे या गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले.
. बामर्डा येथील वणा नदीच्या रेती घाटावरून झालेल्या ९८ लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून रविवारी भरत नागपाल यांची तलवारीने वार करून आणि त्यानंतर नदीपात्रात फेकून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली असून राजकीय वर्तुळातही मोठे पडसाद उमटले आहेत.
. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत सुरुवातीला तीन आरोपींना अटक केली होती. तपासादरम्यान गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने अटकेतील आरोपींची संख्या आता ११ वर पोहोचली आहे. यामध्ये मुख्य सूत्रधार गितेश सातपुतेसह अन्य सहकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी आज कडेकोट बंदोबस्तात सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले. गुन्ह्याचा सखोल तपास, हत्येसाठी वापरलेली शस्त्रे जप्त करणे आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य करत ९ मार्चपर्यंत वाढवून दिली आहे. वरोरा पोलीस आता या प्रकरणातील ‘बॅकलिंक्स’ तपासत आहेत. दोन कोटी पाच लाखांचा व्यवहार, त्यातील थकीत ९८ लाख रुपये आणि या वादात कोणाकोणाचे हितसंबंध गुंतले होते, याचा शोध घेतला जात आहे. “राजकीय आशीर्वाद” असल्याच्या चर्चेमुळे पोलिसांवरही या प्रकरणाचा निपक्षपातीपणे तपास करण्याचे मोठे दडपण आहे.
अधिवेशनात लक्षवेधी, राजकीय वातावरण तापले भरत नागपाल हे सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी असल्याने आणि त्यांची आई पुलगाव पालिकेची नगरसेविका असल्याने या प्रकरणाला मोठे राजकीय वलय प्राप्त झाले आहे. देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात या हत्याकांडाबाबत लक्षवेधी सूचना मांडली. वाळू घाटांवर फोफावलेली गुंडगिरी, अवैध तस्करी आणि त्यातून होणारे प्राणघातक हल्ले यावर त्यांनी सभागृहात आक्रमक भूमिका मांडली. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.



