१.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त
मानोरा फाट्यावर नाकेबंदी करून रंगेहात पकडले
३ किलो गांजासह दुचाकी जप्त
भद्रावती : नागपूरहून चंद्रपूरच्या दिशेने दुचाकीने गांजाची तस्करी करणाऱ्या दोन तरुणांना भद्रावती पोलिसांनी मानोरा फाटा येथे रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी ३ किलो ११६ ग्रॅम गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण १ लाख ६२ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
. हर्षल राजेंद्र रक्षित (२४, रा. पंचशील नगर, काटोल) आणि अंशुमन रवींद्र वीर (२४, रा. येनवा, जि. नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
. मिळालेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी भद्रावती पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एका लाल-काळ्या रंगाच्या होंडा शाईन दुचाकीवरून (क्रमांक MH 40 CN 3966) दोन तरुण नागपूर-चंद्रपूर महामार्गाने गांजा घेऊन जात आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरोरा रोडवरील मानोरा फाटा येथे सापळा रचून नाकेबंदी केली.
. संशयित दुचाकी येताना दिसताच तिला थांबवून विचारपूस केली असता चालकाने व मागे बसलेल्या तरुणाने आपली नावे सांगितली. पोलिसांना संशय आल्याने पंचासमक्ष त्यांच्या जवळील काळ्या रंगाच्या बॅगची झडती घेतली असता, त्यात ६२,३२० रुपये किमतीचा ३ किलो ११६ ग्रॅम गांजा आढळला. पोलिसांनी अमली पदार्थासह ७० हजार रुपयांची दुचाकी आणि ३० हजार रुपयांचे दोन अँड्रॉइड मोबाईल जप्त केले आहेत. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


