सावरी येथे संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
चंद्रपूर : “क्रांतिकारक महापुरुषांचे आणि मातांचे विचार केवळ ऐकण्यासाठी नसून ते जगण्यासाठी असतात. प्रेरणादायी विचारांतूनच समाजात मोठी क्रांती घडून येते,” असे प्रतिपादन फुले-शाहू-आंबेडकरी विचारवंत संजय बोधे यांनी केले.
. रमाई महिला मंडळ सावरी यांच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता फातिमा शेख आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
. नालंदा बौद्ध विहाराच्या प्रांगणात शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्टीच्या समता दूत प्रज्ञा राजुरवाडे होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सोनम मेंढे (समुद्रपूर) आणि मनीषा देठे उपस्थित होत्या.
. यावेळी मार्गदर्शन करताना संजय बोधे यांनी माता जिजाऊंच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. जिजाऊंच्या प्रेरणेमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, असे त्यांनी सांगितले. तसेच महात्मा फुलेंच्या कार्यात सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी खांद्याला खांदा लावून शिक्षणाचा पाया रचला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा महाविद्वान या देशातील बहुजनांच्या कल्याणासाठी कार्य करू शकले, त्यामागे माता रमाईचा असीम त्याग असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. सोनम मेंढे यांनीही महिलांच्या सामाजिक स्थितीवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
. यानंतर सावरी गावातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन पौर्णिमा रामटेके यांनी केले, तर प्रस्तावना सीमा रवी शेंडे यांनी मांडली.
. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमाई महिला मंडळाच्या कार्यकर्त्या पौर्णिमा संदीप ठवरे, अमिषा निखाडे, विजय निखासे, प्रिया शुभम रामटेके, करुणा सिद्धार्थ वाघमारे यांच्यासह सर्व बौद्ध पंच कमिटी आणि युवा सम्यक फेडरेशन सावरीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला परिसरातील महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


