आमदार कीर्तकुमार भांगडिया यांच्या हस्ते ‘कर्ज धोरण’ पुस्तिकेचे प्रकाशन
बँकेत लवकरच ‘इ-केवायसी’ सॉफ्टवेअर होणार कार्यान्वित
वरोरा : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व जिल्हा देखरेख सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा येथील स्व. दादासाहेब देवतळे सभागृहात भव्य प्रशिक्षण शिबिर आणि नवनियुक्त संचालकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे उपस्थित होते.
. कार्यक्रमाचे उद्घाटन चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कीर्तकुमार भांगडिया यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विशेष ‘कर्ज धोरण’ मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. या पुस्तिकेत शेतीपूरक आणि बिगर शेती व्यावसायिक कर्जांची सविस्तर माहिती देण्यात आली असून, ती सभासदांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
. सहकारी बँकेला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी बँक लवकरच ‘इ-केवायसी’ (e-KYC) सॉफ्टवेअर सुरू करणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या आधुनिक प्रणालीमुळे पिकांच्या नुकसानीची माहिती बँकेला त्वरित प्राप्त होईल, ज्यामुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचवणे अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे.
. या सोहळ्याला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संचालक जयंत टेंभुर्डे, रोहित बोमावार, निशिकांत बोरकर, दिनेश चोखारे, डॉ. ललित मोटघरे, गणेश तरवेकर, वरोरा बाजार समितीचे सभापती विजय देवतळे, भद्रावती बाजार समितीचे सभापती राजू टोंगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कल्याणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन संयोजक जयंत टेंभुर्डे आणि वरोरा तालुका सेवा सहकारी संस्था समितीच्या सदस्यांनी केले. या उत्कृष्ट आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


