माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार यांचे प्रशासनाला निवेदन
भद्रावती : भद्रावती नगर परिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेमध्ये शहरातील प्रलंबित नागरी प्रश्न आणि विकासात्मक कामांचा समावेश करावा, या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ॲड. सुनील नामोजवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी नगर परिषदेचे अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
दारू दुकान हटाव आणि बाजारपेठेचे प्रश्न
भाजी मार्केट परिसरातील नगर परिषदेच्या गाळा क्रमांक २७/१ आणि २७/२ मध्ये सध्या देशी दारूचे दुकान सुरू आहे. या दुकानामुळे सर्वसामान्य नागरिक आणि महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने, या दुकानास दिलेले ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करून ते कायमस्वरूपी हटवावे, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच, भाजी मार्केटमधील चिल्लर व ठोक विक्रेत्यांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली आहे.
झोपडपट्टीवासीयांच्या पट्ट्यांचा प्रश्न
शहरातील गवराळा, विजासन, हनुमान नगर, बंगाली कॅम्प, डोलारा, कुंभारबोडी, आंबेडकर वार्ड, शिवाजी नगर आणि सुमठाणा या भागांतील अतिक्रमित झोपडपट्टीवासीयांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचा विषय सभेच्या विषयसूचीवर घेऊन त्यांना न्याय देण्याची मागणी नामोजवार यांनी केली आहे.
पायाभूत सुविधांवर भर
शहरातील स्वच्छतेच्या दृष्टीने जुन्या पोलीस स्टेशन मागील सुलभ शौचालय तातडीने दुरुस्त करून ते वापरासाठी खुले करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, वडाच्या झाडापासून गंगमवार किराणा दुकानापर्यंत आणि पारेलवार दूध डेअरी ते हनुमान नगरपर्यंतच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून दोन्ही बाजूंनी पेव्हर ब्लॉक बसवावेत, असेही निवेदनात नमूद आहे.
. निवेदन सादर करताना ॲड. सुनील नामोजवार यांच्यासह काँग्रेस गटनेत्या सरिता सूर, वंचित बहुजन आघाडीच्या गटनेत्या राखी रामटेके, नगरसेवक अनिल पडोळे, उर्वीला साव, उषा जाधव, जयश्री दुर्योधन, कल्पना भुसारी, रंजना गिरडकर, सीमा पवार व प्रथम गेडाम उपस्थित होते. शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नांवर आगामी सभेत काय निर्णय होतो, याकडे आता संपूर्ण भद्रावतीवासीयांचे लक्ष लागले आहे.


