पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘सफारी गेट‘चे उद्घाटन
३५ कि.मी.चा विस्तीर्ण परिसर आणि वाघ-बिबट्यांचे दर्शन
स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध
चंद्रपूर : चंद्रपूर वनविभागाच्या चंद्रपूर परिक्षेत्रात येत असलेल्या ‘लोहारा जंगल सफारी’चे शानदार उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते पार पडले. या नवीन सफारी गेटमुळे वन्यजीव प्रेमींसाठी पर्यटनाचे एक नवे केंद्र उपलब्ध झाले असून, परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
. या उद्घाटन सोहळ्याला आमदार सुधीर मुनगंटीवार, मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामनुजम, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी, उपवनसंरक्षक योगेश वाघाये, विभागीय वन अधिकारी राजन तलमले, लोहाराच्या सरपंच किरण सिध्दार्थ आदी उपस्थित होते.
![]()
पर्यटनासोबतच रोजगारावर भर
लोहारा सफारी सुरू करण्यामागे वनांचे शाश्वत जतन करणे आणि लोकांचे वनांवरील अवलंबन कमी करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे. ३५ कि.मी. लांबीच्या या सफारी मार्गासाठी जुने रस्ते आणि कूपरस्त्यांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. पर्यटकांना वन्यजीवांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी क्षेत्रात १५ कृत्रिम पाणवठे तसेच नैसर्गिक लोहारा तलावाची सोय करण्यात आली आहे.
वन्यजीवांचे वैभव
लोहारा वनक्षेत्र हे जैवविविधतेने नटलेले असून, येथे पर्यटकांना वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, रानकुत्रे, सांबर, चितळ, निलगाय आणि चौसिंगा यांसारख्या प्राण्यांचे दर्शन घेता येईल. तसेच विविध प्रजातींचे पक्षी आणि रंगीबेरंगी फुलपाखरे हे या सफारीचे विशेष आकर्षण ठरणार आहेत.


