भटाळा नगरीत ‘लोकमान्य’च्या एनएसएस शिबिराचा ऐतिहासिक प्रारंभ
अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून साध्या पद्धतीने पार पडला उद्घाटन सोहळा
वरोरा : लोक शिक्षण संस्थेद्वारा संचालित, लोकमान्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विशेष शिबिराचा उद्घाटन समारंभ भटाळा येथे दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी पार पडला.हे विशेष शिबिर, दिनांक 28 जानेवारी ते 03 फेब्रुवारी 2026 या कालावधीत “माझा विकसित भारत, डिजिटल साक्षरता आणि मतदान जनजागृतीकरिता युवाशक्ती शिबिर” या संकल्पनेवर आधारित आहे.
. या उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मित निधनामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नंतर विद्यापीठ गीत, लोक शिक्षण संस्था, अमृत महोत्सवी वर्ष ध्येय गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. शासकीय दुःखवटा सांभाळून अगदी साध्या पद्धतीने उद्घाटन कार्यक्रम पार पडला.लोक शिक्षण संस्था अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (2025-2026) राष्ट्रीय सेवा योजनेचे हे विशेष शिबिर भटाळा या ऐतिहासिक ठिकाणी असल्याचा आनंद सर्वांना होत आहे.
. या उद्घाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लोकमान्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य, डॉ. जयश्री शास्त्री होत्या. तर उद्घाटक म्हणून प्रा. श्रीकांत पाटील (अध्यक्ष,लोकशिक्षण संस्था, वरोडा) होते. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या व्याप्तीत वाढ ही स्वयंसेवक व ग्रामस्थांसाठी विकास संधी या अनुषंगाने मत मांडले. प्रमुख पाहुणे म्हणून दुष्यंत देशपांडे (सचिव, लोकशिक्षण संस्था,वरोरा), डॉ. ब्रह्मदत्त पांडेय (सदस्य,लोकशिक्षण संस्था ,वरोडा), सुवर्णरेखाताई पाटील, मंगेश मल्हार, बावणे, बर्डे, वंदना दाते, डॉ. बोंडे, धम्मकन्या भालेराव (सरपंच, ग्रामपंचायत,भटाळा) हरिदास जाधव (उपसरपंच ग्रामपंचायत, भटाळा) व ग्रामपंचायत भटाळा उपस्थित होते.
. राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका आणि स्वरूप,विकसीत भारत हा संकल्प पूर्ततेकरिता नागरिकांची कर्तव्य, सामाजिक संवाद, जलसंवर्धन व नागरिकांची कर्तव्य,माहिती तंत्रज्ञानाचा वापर,मतदारानी सावधतेने जनप्रतिनिधी निवडणे, शिबिराचा लाभार्थी वर्ग, शिबिराच्या विविध जुन्या आठवणी, स्वयंसेवकांनी शिबिराच्या माध्यमातून त्या गावातील रोजगार संधी व प्रकल्पांचा शोध घेता येतो.या अनेक विषयांच्या अनुषंगाने मान्यवरांनी स्वयंसेवकांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
. सात दिवस चालणाऱ्या या शिबिरात आरोग्य शिबिर व पशुनिदान शिबीराचे तर बौद्धिक सत्रात, स्वस्थ नारी- सशक्त परिवार, स्वतंत्र भारताचा सुज्ञ नागरीक, सायबर क्राईम, ग्राम निर्माण कला, भटाळ्यातील ऐतिहासिक प्रकल्प स्थळांना भेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, जीवन कौशल्य इत्यादी विषयावर बौद्धिक व्याख्याने तसेच कथाकथन कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी आयोजित आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात दोन दिवस स्वयंसेवकांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच तीन दिवस समाजप्रबोधन व मनोरंजनात्मक कार्यक्रम नियोजीत आहेत. तसेच रोज सकाळी 8 ते 11 या वेळात श्रमदानाचे आयोजन केले आहे.
. कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्रीकांत पुरी, प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. रवींद्र शेंडे तर आभार प्रदर्शन डॉ. दीपक लोणकर यांनी केले. या उद्घाटन कार्यक्रमाला भटाळा ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद हायस्कूल, भटाळा येथील कर्मचारी व विद्यार्थी, स्वयंसेवकांचे संपूर्ण सहकार्य मिळाले.


