लोकप्रतिनिधी उदासीन
नागरिकांचा ओरडून ओरडून घसा कोरडा
मारोती चाफले
कोरपना : चंद्रपूर – यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा, कोरपना ते वणी मार्ग तीन राज्य महामार्गात विभागला असल्याने एकाच वेळेस संपूर्ण कामाचे योग्य नियोजन व देखभाल होत नाही. परिणामी गेल्या तीन दशकापासून या मार्गाची खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशीच परिस्थिती कायम आहे.
. बेचाळीस किलोमीटर अंतराचा हा मार्ग, मोठ्या शहरांना जोडणाऱ्या आम रहदारी सोबतच विविध उद्योगाच्या अवजड वाहतुकीसाठी महत्वपूर्ण आहे. शिवाय घुघूस, गडचांदूर, मुकुटबन, भालर या औद्योगिक नगराना जोडणारे मार्ग ही येथून जोडले आहे. त्यामुळे चोवीस तास वाहनांची वर्दळ या मार्गावरून होते. परंतु वणी ते चारगाव चौकी दरम्यान मार्ग प्रमुख राज्य महामार्ग सहा , चारगाव चौकी ते आबई फाटा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक ३१७ व आबई फाटा ते कोरपना मार्ग राज्य महामार्ग क्रमांक ३७४ मध्ये वर्गीकृत झाला आहे.विशेष म्हणजे पूर्वी वणी ते बोरी पर्यंत हा एकच राज्य महामार्ग अस्तिवात होता.त्यामुळे रस्त्याचे देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजन एकाच वेळीच व्हायचे. कामाचा दर्जा ही अव्वल रहात असल्याने ते बरेच वर्ष काम टिकायचे सुद्धा , परंतु अलीकडे या दोन्ही बाबीची उणीव असल्याने मार्ग एकीकडे सुस्थितीत झाला की दुसरीकडे दुरवस्थेच्या खाईत लोटतो आहे. या दृष्टीने हा संपूर्ण मार्ग वरोरा ते वणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० मध्ये परावर्तित करून कोरपना येथे राजुरा ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ बी ला चौपदरीकरण करून जोडण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
निवेदनाचा पाऊस मात्र हालचाली थंडबस्त्यात रस्ता दुरावस्थेच्या वारंवारच्या कटकटीला त्रासून कोरपना ते वणी मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून चौपदरीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी अनेकदा परिसरातील स्थानिकांकडून मंत्री स्तरापर्यंत निवेदन दिले. परंतु आजगायत आश्वासना पलीकडे दुसरे काहीच होऊ शकले नाही. त्यामुळे ४२ किलोमीटर प्रवास वाहतूकदारांचा अंत पाहतो आहे.
बांधकाम विभागाचे एकमेकांकडे बोट या रस्त्याचे ३३ किलोमीटरचे बांधकामाचे नियोजन सार्वजनिक बांधकाम उपविभाग वणी तर अवघ्या नऊ किलोमीटरचे नियोजन गडचांदूर उपविभागाकडे आहे. परंतु रस्ता तर सोडाच साधे किलोमीटर दगड, दिशादर्शक फलक या मार्गावर लागले नाही. यावरून या मार्गाबद्दल किती अनास्था ते दिसून येते.


