बिबी येथील रामनगरमधील घटना
कारवाईसाठी नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
कोरपना : तालुक्यातील बिबी येथील रामनगरमधील शिवराज पांडुरंग जाधव (२१) या युवकाची शुल्लक कारणावरून चाकूने गळ्यावर व चेहऱ्यावर सपासप वार करून भर दिवसा हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना गुरुवार दि. ६ ला दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान घडली. अविनाश राधाकृष्ण पिल्ले (३०) व आशिष राधाकृष्ण पिल्ले (२४) रा. रामनगर बिबी अशी आरोपीची नावे आहे.
. सविस्तर वृत्त असे की, मृतक शिवराज व आरोपी अविनाश पिल्ले हे दोघेही घर शेजारी आहे. 6 फेब्रुवारी ला दोघांत घरगुती विषयावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या अविनाश ने भावाची मदत घेत धारदार चाकूने गळ्यावर व चेहर्यावर वार करत शिवराजची भर दिवसा हत्या केली. व त्याचा मृतदेह बिबी येथील स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला फेकून दिला. अविनाश पिल्ले हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती आहे.
. या घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार शिवाजी कदम सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती गावात माहीत होताच मृतकाचे नातेवाईक व गावकरी यांनी गडचांदूर पोलिस ठाण्यात गर्दी करत मृतक शिवराजच्या हत्तेमध्ये संपूर्ण परिवार सहभागी असल्याचा आरोप उपस्थित वॉर्डवासीयांनी केला व संपूर्ण परिवाराला हत्या प्रकरणात आरोपी बनवण्याची मागणी यावेळी केली. हत्या केल्यानंतर अविनाश पिल्ले ह्याने पोलिसांना समर्पण केले असून आरोपीचा भाऊ आशिष राधाकृष्ण पिल्ले व त्याचे आई वडील पसार झाले असून गडचांदूर पोलिस त्यांच्या शोधात आहे. आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास गडचांदूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलिस करीत आहे.


