Home चंद्रपुर जिल्हा विशेष लाडबोरी शेत शिवारात पट्टेदार वाघाचा मृत्यू

लाडबोरी शेत शिवारात पट्टेदार वाघाचा मृत्यू

1202

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील घटना

शवविच्छेदन अहवाल नंतरच कळणार वाघाच्या मृत्यूचे कारण

सिंदेवाही : वनपरिक्षेत्र कार्यालय सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या लाडबोरी येथील रमेश गंडाईत यांचे शेताजवळ असलेल्या सरकारी नाल्याजवळ एक पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळून आला असल्याने वनविभागसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

.      सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत उपवन क्षेत्र तथा नियतक्षेत्र सिंदेवाही मध्ये बीट वनरक्षक हे बुधवारी सकाळी गस्त करीत असताना मौजा लाडबोरी शेत शिवारातील रमेश पांडुरंग गंडाइत यांचे सर्व्हे नंबर १४३ शेतालगत असलेल्या सरकारी नाल्याजवळ एक पट्टेदार वाघ मृत अवस्थेत असल्याचे आढळून आले. बीट वनरक्षक यांचेकडून सदर माहिती वनविभागाला होताच अधिनिस्त क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक, अधीनिस्त कर्मचारी, आरआरयू चमू, इत्यादींना घेऊन घटनास्थळी पोहचले. मोका पंचनामा करून घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यामुळे घटनास्थळावर ब्रम्हपुरी वनविभाग उपवनसंरक्षक राकेश सेपट, सहाय्यक वनसंरक्षक ब्रम्हपुरी (प्रादे. व.वन्यजीव) एम.बी.चोपडे, सहाय्यक वनसंरक्षक ( तेंदू) महेश गायकवाड, चंद्रपूर वन्यजीव पशू वैद्यकीय अधिकारी डॉ रविकांत खोब्रागडे, चंद्रपूर मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव चे) प्रतिनिधी मुकेश भांदककर, स्वाब नेचर केअर फाऊंडेशन चे अध्यक्ष यश कायरकर, जिवशात्रज्ञ ब्रम्हपुरी विभाग डॉ. राकेश अहुजा, सिंदेवाहीचे पशुधन विकास अधिकारी डॉ विनोद सुरपाम, पशुवैद्यकीय अधिकारी शालिनी लोंढे, इत्यादींच्या उपस्थितीत मृत वाघाचे निरीक्षण करण्यात आले.

.        सदर मृत वाघ (नर) वयोवृद्ध असल्याचे प्राथमिक निरीक्षणावरून दिसून आले आहे. वाघाचे सर्व अवयव शाबूत असून वनविभागअधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, यांचे उपस्थितीत पंचासमक्ष मोका पंचनामा नोंदविण्यात आला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कडून घटनास्थळी शवविच्छेदन करून उत्तरीय तपासणी करीता विसेरा घेण्यात आला. आणि पंचासमाक्ष वीसेरा सीलबंद करण्यात आला. आणि त्यानंतर मृत वाघाला घटनास्थळीच दहन करण्यात आले. वनविभागाकडून वन गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रयोग शाळेतून अहवाल आल्यानंतरच वाघाच्या मृत्यूचे कारण कळू शकणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!