Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा वनविभागाचा ‘स्ट्राईक फोर्स’

वरोरा वनविभागाचा ‘स्ट्राईक फोर्स’

205

शिंदोला येथील १५ हेक्टर वनजमिनीवरील अतिक्रमण भुईसपाट !

१३ अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल

आता त्याच जागेवर फुलणार पशुधनासाठी ‘वैरण विकास’ प्रकल्प

वरोरा : वनविभागाच्या वरोरा परिक्षेत्राने अवैध कब्जा करणाऱ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून, बुधवारी रामपूर नियतक्षेत्रातील शिंदोला गावात मोठी धडक कारवाई करण्यात आली. तब्बल १५ हेक्टर राखीव वनजमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

वैध पुराव्याअभावी कारवाईचा बडगा
या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या १३ धारकांना वनविभागाने यापूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या. त्यांना जमिनीशी संबंधित वैध कागदपत्रे सादर करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, एकाही अतिक्रमणधारकाने पुरावे सादर न केल्याने ही जागा राखीव वन असल्याचे स्पष्ट झाले. अखेर प्रशासनाने कडक पाऊल उचलत बुधवारी पहाटेपासूनच कारवाईला सुरुवात केली.

जेसीबीच्या साहाय्याने बांधकामे जमीनदोस्त
बुधवारी पहाटे वनविभागाचे पथक जेसीबी आणि ट्रॅक्टरसह शिंदोला गावात दाखल झाले. कक्ष क्रमांक ७-अ मधील बेकायदेशीर बांधकामे आणि शेतीसाठी करण्यात आलेले अतिक्रमण पूर्णपणे हटवण्यात आले. ही सर्व कारवाई नियमानुसार पार पडली असून, सर्व १३ आरोपींविरुद्ध वनकायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

गावकऱ्यांच्या हिताचा ‘वैरण विकास’ प्रकल्प
केवळ अतिक्रमण हटवून न थांबता, या जमिनीचा वापर आता सार्वजनिक उपयोगासाठी केला जाणार आहे. गावकऱ्यांच्या मागणीचा विचार करून या १५ हेक्टर जागेवर ‘वैरण विकास’ (गवती कुरण) प्रकल्प राबविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील पशुधनासाठी मुबलक चारा उपलब्ध होईल आणि स्थानिक दुग्ध व्यवसायाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.

यांच्या नेतृत्वात झाली मोहीम
सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत क्षेत्र सहाय्यक डी. बी. चांभारे (टेमर्डा), जे. के. लोणकर (शेगाव), आर. पी. राठोड (वरोरा), वनपाल व्ही. एम. ढुमणे, वनरक्षक पी. आर. ब्रम्हणात (रामपूर) यांच्यासह वनकर्मचारी, पोलीस पाटील, संरक्षित वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि PRT सदस्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून कामगिरी बजावली.

.     भविष्यात अशा प्रकारचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही आणि कारवाईचा वेग आणखी वाढवला जाईल, असा सज्जड इशारा वन प्रशासनाने दिला आहे.

error: Content is protected !!