Home चंद्रपुर जिल्हा विशेष चंद्रपुरात आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

चंद्रपुरात आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

205

५७ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

मध्यप्रदेशातील ४ आरोपी जेरबंद

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या दोन धाडसी घरफोडीच्या घटनांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि रामनगर पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मध्यप्रदेशातील एका आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले असून, त्यांच्याकडून तब्बल ५७ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लग्नासाठी गेले अन् घर लुटले
७ फेब्रुवारी रोजी वडगाव परिसरातील चिंतामणी रेसिडेन्सी येथील रहिवासी शुभम प्रदीप बारधमवार हे कुटुंबासह राजुरा येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. त्याच दिवशी शेजारील सिद्धी अपार्टमेंटमधील ज्योती दिनेश चंदनपाट यांच्याही बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली होती. या दोन्ही घटनांची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी वेगाने तपास चक्रं फिरवली.

मध्यप्रदेशातून आवळल्या मुसक्या
तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने या चोऱ्यांमागे मध्यप्रदेशातील टोळीचा हात असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार पोलिसांनी मध्यप्रदेशातील धार आणि अलीराजपूर जिल्ह्यात शोधमोहीम राबवून चार आरोपींना अटक केली. अटकेतील आरोपींची नावे राकेश मंगलसिंग मेहडाक्ष (२५, रा. बघोली, जि. धार), कंचन भगतसिंग मंडलोही (४०, रा. बघोली, जि. धार), थानसिंग मेहतु भुरीया (२६, रा. बडीउपी, जि. अलीराजपूर), महेश कालु भुरीया (२५, रा. गुराडीया, जि. धार) आरोपींनी चौकशीदरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात यापूर्वी इतर ४ ठिकाणीही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

मोठा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून एकूण ५७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात:सोन्याचे दागिने: ३२९ ग्रॅम (किंमत अंदाजे ५१ लाख ९८ हजार रु.),चारचाकी वाहन: (GJ 14-AP 4098) (किंमत ५ लाख रु.), मोबाईल फोन: ६ नग (किंमत ६० हजार रु.)

तपास पथकाची कामगिरी
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

.      या मोहिमेचे प्रत्यक्ष नेतृत्व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि रामनगरचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांनी केले. तपास पथकात सपोनि शिवाजी नागवे, पीएसआय विनोद भुरले, पीएसआय सुनील गौरकार, पीएसआय कृष्णा दराडे, सुभाष गोहोकार यांच्यासह कर्मचारी सतीश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार (LCB) आणि रामनगर पोलीस ठाण्याचे आनंद खरात, संदीप कामडी, प्रकाश मडावी, प्रफुल पप्पुलवार, पंकज ठोबरे, कार्तिक खनके, विरू यादव, वैभव पत्तीवार व गुणवंत मुंडके यांचा समावेश होता.

error: Content is protected !!