जिल्हाधिकाऱ्यांचे तपासणीचे निर्देश
इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची सतर्कता
तहसीलदार आणि पोलिसांना पथके स्थापन करून कारवाई करण्याचे आदेश
चंद्रपूर: जागतिक स्तरावर निर्माण होत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात इंधन तुटवड्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि गॅसचा अवैध वापर व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना आखल्या आहेत. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी या संदर्भात संबंधित सर्व यंत्रणांना विशेष निर्देश दिले आहेत.
. केंद्र व राज्य शासनाचे आदेश, नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी गॅस एजन्सींच्या तपासण्या करण्याबाबत शासनाकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व पोलीस निरीक्षक, मनपा आयुक्त, सर्व नगर परिषद मुख्याधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात तात्काळ ‘दक्षता पथक’ किंवा ‘फिरते पथक’ स्थापन करावे आणि नियमितपणे तपासण्या कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत राहील, याची विशेष दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जर घरगुती गॅसचा वापर व्यावसायिक कामासाठी किंवा इतर कोणत्याही अवैध कारणांसाठी होत असल्याचे आढळल्यास, संबंधित दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
. या मोहिमेत पारदर्शकता आणि सातत्य राखण्यासाठी संबंधित विभागांनी केलेल्या तपासण्या व कारवाईचा ‘अनुपालन अहवाल’ नियमितपणे जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
. जिल्ह्यातील नागरिकांनी घरगुती गॅसचा वापर केवळ घरगुती कारणांसाठीच करावा. तसेच, कुठेही गॅसचा अवैध वापर किंवा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास, त्याबाबतची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


