Home विशेष मध्यमवर्गीय गृहकर्जदारांना ₹२.५० लाखांची सबसिडी तात्काळ द्या !

मध्यमवर्गीय गृहकर्जदारांना ₹२.५० लाखांची सबसिडी तात्काळ द्या !

458

खासदार प्रतिभा धानोरकर यांची केंद्रीय मंत्र्यांकडे आग्रही मागणी

चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांना बसतोय आर्थिक फटका

प्रलंबित ‘क्रेडिट लिंक्ड सबसिडी’साठी मनोहर लाल यांना पत्र

चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत मध्यमवर्गीय (MIG) गृहकर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणारी ₹ २.५० लाखांची प्रलंबित ‘क्रेडिट लिंक्ड सबसिडी’ तात्काळ वितरित करण्यात यावी, अशी आग्रही मागणी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय आवासन आणि शहरी कार्य मंत्री मनोहर लाल यांना सविस्तर पत्र पाठवून, चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांना भेडसावणाऱ्या या गंभीर समस्येकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.

२०१७ ते २०२१ मधील लाभार्थी अद्यापही वंचित
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले की, सन २०१७ ते २०२१ या कालावधीत बँकांकडून गृहकर्ज घेणाऱ्या अनेक पात्र लाभार्थ्यांना अद्याप योजनेनुसार अपेक्षित असलेली सबसिडी प्राप्त झालेली नाही. केंद्र सरकारची ही योजना मध्यमवर्गीयांना हक्काचे घर मिळावे यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली होती. मात्र, पात्र असूनही चार-पाच वर्षे उलटूनही ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.

बँकेच्या व्याजाचा बसतोय प्रचंड भुर्दंड
‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ या संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, सबसिडी वेळेवर न मिळाल्याने सर्वसामान्य कर्जदारांवर ₹२.५० लाखांच्या अतिरिक्त मुद्दलाचा आणि त्यावर दरमहा वाढत असलेल्या व्याजाचा मोठा आर्थिक भार पडत आहे. यामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये केंद्र सरकारच्या या दिरंगाईबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

तातडीने कार्यवाही करण्याची मागणी
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, ज्या पात्र लाभार्थ्यांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव किंवा निधीअभावी प्रलंबित आहेत, त्यांना सबसिडीची रक्कम तात्काळ वितरित करण्यासाठी संबंधित विभागाला तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे. केंद्र सरकारने यावर तातडीने कार्यवाही करून सामान्य कुटुंबांना दिलासा द्यावा, असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!