कालवडची शिकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल
सुरक्षा भिंतीजवळच बिबट्याचे दर्शन
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा
बल्लारपूर : चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावरील विसापूर फाटा परिसरात रविवारी मध्यरात्री बिबट्याने एका कालवडची शिकार केल्याची घटना घडली. या शिकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
. विसापूर गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या मुख्य मार्गावर रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास बिबट्याने कालवडची शिकार केली. हा मार्ग नेहमीच वर्दळीचा असून गावातील नागरिक रात्री-अपरात्री या मार्गाने ये-जा करतात. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही शिकार झाली तिथे बॉटनिकल गार्डनची सुरक्षा भिंत आहे. आतापर्यंत या भिंतीमुळे आपण सुरक्षित आहोत असे नागरिकांना वाटत होते, मात्र प्रत्यक्ष भिंतीजवळच बिबट्याने शिकार केल्याने प्रवाशांच्या मनात भीती घर करून आहे.
. घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे, वनरक्षक वर्षा पिपरे, वन कर्मचारी व बॉटनिकल गार्डनच्या सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या पथकाने बिबट्याला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले. ऐन वर्दळीच्या रस्त्यावर बिबट्याचा वावर वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी विसापूरवासीयांनी केली आहे. दरम्यान, नागरिकांनी या मार्गाने प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.


