आंतरराष्ट्रीय स्तरावर चंद्रपूरचा दबदबा
द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी लोकसभेच्या अध्यक्षांकडून महत्त्वाची जबाबदारी
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची ‘भारत-उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटा’च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १८ व्या लोकसभेच्या कार्यकाळासाठी लोकसभेच्या माननीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार ही निवड जाहीर करण्यात आली असून, यामुळे खासदार धानोरकर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
. लोकसभा सचिवालयाकडून (परिषद आणि शिष्टाचार शाखा) या निवडीचे अधिकृत पत्र खासदार धानोरकर यांना प्राप्त झाले आहे. भारत आणि उझबेकिस्तान या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे, तसेच दोन्ही राष्ट्रांमधील सांस्कृतिक, राजकीय आणि व्यापारी देवाणघेवाण वाढवणे, हा या संसदीय मैत्री गटाचा मुख्य उद्देश आहे.
. या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि दोन देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक मजबूत करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे.” यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे आभार मानले आहेत. या निवडीमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह राजकीय वर्तुळातून खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


