Home चंद्रपुर जिल्हा विशेष ३ वर्षांच्या चिमुकल्याची साडेतीन लाखांत विक्री

३ वर्षांच्या चिमुकल्याची साडेतीन लाखांत विक्री

271

तेलंगणातील ५ महिलांना अटक

बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण

अवघ्या २० तासांत पोलिसांनी लावला छडा

चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई

चंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून आई-वडिलांच्या कुशीतून पळवलेल्या एका तीन वर्षांच्या चिमुकल्याचा चंद्रपूर पोलिसांनी अवघ्या २० तासांत शोध लावून त्याला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. या मुलाचे अपहरण करून तेलंगणातील एका टोळीने त्याला साडेतीन लाख रुपयांत विकले होते. याप्रकरणी पोलिसांनी तेलंगणातील मंचेरियल येथून पाच महिलांना अटक केली आहे.

नेमकी घटना काय ?
बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरात कचरा वेचून उदरनिर्वाह करणारी एक महिला २७ फेब्रुवारीच्या रात्री आपल्या कुटुंबासह रेल्वे स्टेशनसमोरील मोकळ्या मैदानात झोपली होती. मध्यरात्री कुटुंब गाढ झोपेत असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. २८ फेब्रुवारीला सकाळी ही बाब लक्षात येताच बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

तपासाचे चक्र फिरले
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि बल्लारपूर पोलिसांची सात पथके तत्काळ रवाना केली. पोलिसांनी परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान एक संशयास्पद चारचाकी गाडी मुलाला घेऊन तेलंगणातील मंचेरियलकडे गेल्याचे स्पष्ट झाले.

साडेतीन लाखांत व्यवहार
तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, ऐलक्का बुद्दे, राणी पसनोटी आणि संगीता पानंगणती या महिलांनी दोन पुरुष साथीदारांच्या मदतीने मुलाचे अपहरण केले होते. त्यांनी या मुलाला मंचेरियल येथील सातक्का करेरे आणि लावण्या कोणा या महिलांना ३ लाख ५० हजार रुपयांत विकले होते.

पोलिसांची धाडसी कारवाई
तांत्रिक पुरावे आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेच्या आधारे पोलिसांनी मंचेरियल येथे छापा टाकून पाचही महिलांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी मुलाला हस्तगत करून पालकांकडे सोपवले. या टोळीने आणखी किती मुलांचे अपहरण केले आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. फरार असलेल्या अन्य दोन पुरुष आरोपींच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि त्यांच्या पथकाने फत्ते केली.

error: Content is protected !!