देवदर्शनाच्या बहाण्याने नेऊन जबरदस्तीने लावले लग्न
दुर्गापूर आणि भद्रावती पोलिसांच्या कारवाईमुळे पीडितेची सुटका
चंद्रपूर : मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. एका १८ वर्षीय तरुणीला तिच्याच मैत्रिणीने फसवून चक्क मध्य प्रदेशात दीड लाख रुपयांना विकल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेची तिथून सुटका करण्यात पोलिसांना यश आले असून, मानवी तस्करीच्या या मोठ्या रॅकेटमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
विश्वासाला तडा : देवदर्शनाचे दिले आमिष
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी पीडित तरुणी कॅटरिंगचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होती. २९ डिसेंबर २०२५ रोजी घरात किरकोळ वाद झाल्याने ती भद्रावती येथे आपल्या मैत्रिणीकडे राहायला गेली. मात्र, संकटात मदत करण्याऐवजी मैत्रिणीनेच तिच्या विक्रीचा कट रचला. ‘कुबेश्वरधाम’ येथे देवदर्शनाला जाऊ, असे खोटे सांगून तिला मध्य प्रदेशात नेण्यात आले.
दीड लाखांत सौदा आणि जबरदस्तीचा विवाह
कुबेश्वरधामहून पीडितेला राजगड जिल्ह्यातील मुगलखेडी येथे नेले गेले. ६ जानेवारी २०२६ रोजी आरोपींनी जबरदस्तीने एका स्टॅम्प पेपरवर तिची स्वाक्षरी घेतली आणि तिचा विवाह लावून दिला. तपासात धक्कादायक बाब समोर आली की, या लग्नासाठी आरोपींनी पीडितेची दीड लाख रुपयांना विक्री केली होती. लग्नानंतर तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार सुरू झाले. “दिलेले पैसे परत केल्याशिवाय तुला सोडणार नाही,” अशी धमकी देत तिला डांबून ठेवण्यात आले होते.
भावाच्या फोनमुळे वाचले प्राण
अनेक दिवसांच्या नरकयातना भोगल्यानंतर, पीडितेला एकदा मोबाईल मिळाला. तिने त्वरित आपल्या भावाला फोन करून आपबिती सांगितली. घटनेची भीषणता ओळखून भावाने पोलिसांकडे धाव घेतली. दुर्गापूर पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळत मध्य प्रदेश गाठले आणि तिथून तरुणीची सुखरूप सुटका केली.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
३० जानेवारी २०२६ रोजी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी विभा धोटे, विक्की लारोकर, लक्की धोटे आणि इतर साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १४३ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विरेंद्र केदारे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


