Home सामाजिक चंद्रपूर मनपा महापौर-उपमहापौर निवडणूक

चंद्रपूर मनपा महापौर-उपमहापौर निवडणूक

340

३६ अर्जांची उचल : राजकीय घडामोडींना वेग !

भाजपकडून १८, तर काँग्रेसकडून १० अर्जांची उचल

१० फेब्रुवारीला राणी हिराई सभागृहात रंगणार निवडणूक

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. नागपूर विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेसाठी अर्ज उचलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी विविध पक्षांकडून एकूण ३६ अर्जांची उचल करण्यात आली आहे.

पक्षनिहाय अर्जांची आकडेवारी
मिळालेल्या माहितीनुसार, सत्ता स्थापनेसाठी चुरस निर्माण झाली असून भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक १८ अर्ज घेतले आहेत. त्यापाठोपाठ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १० अर्ज, शेतकरी कामगार पक्षाने ४ आणि अपक्ष उमेदवारांनी ४ अर्जांची उचल केली आहे. यामुळे दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

उद्या अर्जांची प्रत्यक्ष विक्री आणि स्वीकृती
उद्या, गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील नगरसचिव कक्षात हे अर्ज स्वीकारले जातील. अर्जासोबत उमेदवारांना आधार कार्ड, निवडणूक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र (किंवा सादर केल्याची पावती) यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

१० फेब्रुवारीला होणार फैसला
नवनियुक्त सदस्यांची पहिली विशेष सभा १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मनपाच्या ‘राणी हिराई’ सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. याच सभेत नव्या महापौरांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याने, चंद्रपूरच्या राजकारणात आता कोणाचे वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!