पॅरालिसिसवर मात करून पचमढी दर्शनावरून परतल्यानंतर काळाचा घाला
विसापूर गावात शोककळा
बल्लारपूर : नियतीचा खेळ खरोखरच अजब आणि क्रूर असतो, याचा प्रत्यय विसापूर येथे आला आहे. घरची सर्व जबाबदारी खांद्यावर असलेला आणि कुटुंबाचा एकमेव आधार असलेला रोशन दशरथ गिरडकर (३४) या तरुणाचे शुक्रवारी (३० जानेवारी) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्याच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
. रोशनच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. घरी मनोरुग्ण वडील, मतिमंद बहीण, वृद्ध आई, पत्नी आणि एक छोटी मुलगी असा मोठा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी रोशनला अर्धांगवायूचा (पॅरालिसिस) झटका आला होता, ज्यामुळे त्याला आपले खासगी ड्रायव्हरचे काम सोडावे लागले होते. अशा कठीण काळात त्याची आई आणि पत्नी मजुरी करून घराचा गाडा हाकत होत्या.
. अलीकडेच प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रोशन मध्य प्रदेशातील पचमढी येथील ‘मोठा महादेव’ दर्शनासाठी गेला होता. बुधवारी तो आनंदाने घरी परतला, मात्र गुरुवारी अचानक त्याची प्रकृती खालावली. त्याला तातडीने चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
. शनिवारी दुपारी १:३० वाजता विसापूर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका जिद्दी तरुणाच्या अशा जाण्याने कुटुंबावर आभाळ कोसळले असून, विसापूर ग्रामस्थांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.


