बच्चू कडूंनी घेतली शहीद राहुल चौधरींच्या परिवाराची भेट”
आसाळा येथील धम्म समारंभालाही लावली हजेरी
वरोरा : माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी नुकताच वरोरा तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत खेमजई येथील शहीद जवान राहुल चौधरी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच आसाळा येथील धम्म समारंभात उपस्थित राहून राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर केला.
शहीद कुटुंबाच्या दु:खात सहभागी
सशस्त्र सीमा बल ४० बटालियन (पाटणा) येथे कर्तव्य बजावत असताना २९ डिसेंबर २०२५ रोजी राहुल चौधरी यांचा अपघात झाला होता. पाटणा येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना २० जानेवारी २०२६ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे खेमजई गावावर शोककळा पसरली आहे. बच्चू कडू यांनी शहीद राहुल यांच्या वीरमातेची व कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. “शहीद कुटुंबाच्या पाठीशी प्रहार संघटना खंबीरपणे उभी असून, शासनस्तरावरून त्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” अशी ग्वाही कडू यांनी यावेळी दिली.
ग्रामगीतेतून आत्मनिर्भरतेचा संदेश
शहीद कुटुंबाची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी आसाळा येथे आयोजित दोन दिवसीय धम्म समारंभ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याला भेट दिली. यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी ग्रामगीतेचे महत्त्व विषद केले. कडू म्हणाले की, “आजच्या काळात गाव सुसंस्कृत आणि आत्मनिर्भर बनवायचे असेल, तर राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत मांडलेले विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे ही काळाची गरज आहे.”
. या दौऱ्याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


