Home सामाजिक अकोला येथील बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी अनुभवली ‘खरी कमाई’

अकोला येथील बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी अनुभवली ‘खरी कमाई’

337

चकली आणि चिवड्याच्या स्टॉलला खवय्यांची सर्वाधिक पसंती !

जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले व्यवहारी शिक्षणाचे धडे

सर्वच स्टॉल नफ्यात राहिल्याने चिमुकल्यांचा उत्साह द्विगुणित

वरोरा : तालुक्यातील अकोला नं. १ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच ‘बाल आनंद मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यांतर्गत राबविण्यात आलेल्या “खरी कमाई” या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वर्गातील शिक्षणासोबतच प्रत्यक्ष बाजारपेठेतील व्यवहारी ज्ञान प्राप्त झाले. या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.

.      या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. यामध्ये अनुराधा उमरेचा ‘कच्चा चिवडा’, प्रियांश उमरेचे ‘पिंगर आणि भजे’, आस्था आत्रामचा ‘कडक चहा’, अंश आत्रामचा ‘आलुपोहा’, माही मरापेचे ‘रसभरीत गुलाबजामून’, तन्वीश रंदईचे ‘लाडू’ आणि अंश सावसाकडेची ‘कुरकुरीत चकली’ अशा चविष्ट पदार्थांचा समावेश होता. मेळावा सुरू होताच हे खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी पालकांनी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.

.        अवघ्या काही तासांतच सर्व स्टॉलवरील खाद्यपदार्थ संपले. विशेष म्हणजे, या संपूर्ण विक्रीमध्ये अंश सावसाकडेच्या ‘कुरकुरीत चकली’ने सर्वाधिक कमाई करत प्रथम क्रमांक पटकावला, तर अनुराधा उमरेच्या ‘कच्च्या चिवड्या’चा स्टॉल दुसऱ्या क्रमांकावर राहिला. इतरही सर्व विद्यार्थ्यांनी ५० ते ६० टक्क्यांहून अधिक नफा कमविला असून, कोणाचेही नुकसान झाले नाही. कडक चहाच्या स्टॉलनेही शेवटपर्यंत ग्राहकांना खिळवून ठेवले.

.        या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे विठ्ठल उमरे, अनिता मरापे, कल्याणी रंदई, पांडुरंग उमरे, अनिल सावसाकडे, स्मिता आत्राम, प्रणाली उमरे यांसह शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी आणि गावातील युवक-मंडळींनी सहकार्य केले. या मेळाव्यात मोठ्या संख्येने महिला, पालक आणि आबालवृद्ध सहभागी झाले होते. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे शिक्षकांनी सांगितले.

error: Content is protected !!