दिवंगत अजितदादा पवारांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली
खासदार प्रतिभा धानोरकर व आमदार करण देवतळे यांची उपस्थिती
पक्षभेद विसरून वरोराकरांनी वाहिली श्रद्धांजली
वरोरा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात अकाली निधन झाले. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर वरोरा येथे एका सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या माध्यमातून राजकीय मतभेद बाजूला ठेवून मानवतेचा धर्म जपण्याचा एक सकारात्मक संदेश समाजाला देण्यात आला.
. या शोकसभेला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, वरोरा नगरपरिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
. उपस्थित मान्यवरांनी आपल्या शोकपर भाषणातून अजित पवार यांच्या कार्यशैलीचे, त्यांच्या निर्णयक्षमतेचे आणि जनसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचे स्मरण केले. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील महत्त्वाचे टप्पे आणि विकासात्मक कार्याचा आढावा घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. वरोरा शहरात सर्वपक्षीय एकतेचे दर्शन घडवणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


