दोन जि.प.व चार पंचायत समिती मध्ये मोर्चेबांधणी
उमेदवार निवडीसाठी भाजप व कांग्रेसचे विचारमंथन
अनेकेश्वर मेश्राम
बल्लारपूर : तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती चे गण आहे. आगामी जि.प.व पंचायत समिती निवडणूक लवकरच होऊ घातली आहे.अलीकडेच गट व गणाचे आरक्षण जाहीर केले आहे. आजघडीला बल्लारपूर तालुक्यात भाजपाचे वर्चस्व दिसून येत आहे. मात्र,भाजपाच्या वर्चस्वाला कांग्रेस शह देण्याच्या प्रयत्न सुरु झाला आहे.यासाठी दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची निवड करण्यावरून विचारमंथन केले जात आहे.
. बल्लारपूर तालुक्यात विसापूर – बामणी गटात १७ हजार ९3७ मतदार असून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला (ओबीसी) साठी आरक्षीत झाला आहे. पळसगाव – कोठारी जिल्हा परिषद गटात एकूण १८ हजार २१४ मतदार असून हा गट नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला (ओबीसी) राखीव झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.
. त्याचप्रमाणे विसापूर पंचायत समिती गणामध्ये ८ हजार १0७ मतदार असून आरक्षण सर्वसाधारण असे आहे. बामणी गणात एकूण ९ हजार ८30 मतदार असून गणाचे आरक्षण नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला ( ओबीसी ) असे आरक्षण आहे. पळसगाव गणात एकूण ९ हजार 3२६ मतदार असून सदर गण अनुसूचित जमाती ( एसटी ) सर्वसाधारण राखीव आहे. कोठारी गणात एकूण ८ हजार ८८८ मतदार निर्धारित करण्यात आले असून या गणाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला ( एससी ) असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. बल्लारपूर तालुक्याच्या दोन जिल्हा परिषद गटात व चार पंचायत समिती गणात भाजप व कांग्रेस पक्षात आजतागायत लढत झाली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दरम्यान या दोन पक्षांच्या उमेदवारात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. यामुळे भाजपाचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात भाजपाला शह देण्याचा आटोकाट प्रयत्न कांग्रेस पक्षांकडून होत आहे.
बल्लारपूर तालुक्यात २0१७ मध्ये असी झाली होती लढत बल्लारपूर तालुक्यात यापूर्वी २0१७ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती. यामध्ये दोन जिल्हा परिषद गटात व चार पंचायत समिती गणात सर्वच जागा भाजपाला मिळाल्या होत्या. पळसगाव – कोठारी जिल्हा परिषद गटात वैशाली राजू बुद्धलवार व विसापूर – बामणी गटात ॲड.हरीश गेडाम हे दोन्ही भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. त्याच प्रमाणे पंचायत समिती गणात विसापूर मध्ये भाजपाच्या विद्या गेडाम (मते – १९९२) यांनी कांग्रेस उमेदवार संध्या पेंदोर (मते – ११७६) यांचा पराभव केला होता. बामणी गणात भाजपाचे उमेदवार गोविंदा पोडे ( मते – 3५८८) यांनी कांग्रेस उमेदवार प्रकाश मोरे (मते – १0४७) यांचा दारूण पराभव केला होता. पळसगाव गणात भाजपाच्या उमेदवार इंदिरा पिपरे ( मते – 3६६५ ) यांनी कांग्रेस उमेदवार लक्ष्मी येल्लोरे ( मते – १3८५ ) यांचा लिलया पराभव करून विजय संपादन केला. कोठारी गणात भाजपाचे उमेदवार सोमेश्वर पदमगिरीवार ( मते – 3२५0 ) यांनी कांग्रेस उमेदवार धीरज निरंजने ( मते – १3४0 ) यांचा पराभव करून विजयी झाले होते. आता २0२५ च्या सार्वत्रिक निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


