Home राजकीय चिमूरात काँग्रेसला ‘महाधक्का’

चिमूरात काँग्रेसला ‘महाधक्का’

295

वारजुकर परिवाराचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश !

दशकांचा ‘हात’ सोडला

अंतर्गत गटबाजीला कंटाळून वारजुकरांनी धरले ‘कमळ’

नेरी : चिमूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात एक मोठा ‘राजकीय भूकंप’ झाला. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या क्षेत्रात पक्षाचे सर्वात वजनदार नाव असलेले वारजुकर कुटुंब आता अधिकृतपणे भाजपवासी झाले आहे. माजी आमदार अविनाश वारजुकर यांच्यासह त्यांच्या संपूर्ण फळीने भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्याने विदर्भातील काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

गटबाजीला कंटाळून घेतला निर्णय
गेल्या अनेक वर्षांपासून चिमूर तालुक्यात काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या वारजुकर परिवाराने पक्षातील वाढती अंतर्गत गटबाजी आणि समन्वयाचा अभाव याला कंटाळून हा निर्णय घेतला. पक्षात निष्ठावंतांची होणारी गळचेपी आणि विकासाच्या कामात येणारे अडथळे यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ होते. अखेर, विकासाच्या मुद्द्यावर वारजुकरांनी काँग्रेसला रामराम ठोकला. काही महिन्यांपूर्वीच सहकार नेते संजय डोंगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, आता वारजुकरांच्या रूपाने काँग्रेसची उरलीसुरली ताकदही क्षीण झाली आहे.

दिग्गज नेत्यांची भाजपमध्ये एन्ट्री
भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये चिमूरचे अनुभवी नेते माजी आमदार अविनाश वारजुकर, ग्रामीण भागावर मजबूत पकड असलेले माजी जि.प. अध्यक्ष सतीश वारजुकर आणि युवा नेतृत्व सरपंच शाईश वारजुकर यांचा समावेश आहे. या दिग्गज नेत्यांसोबतच शेकडो कार्यकर्त्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला.

“विकासासाठी ऐतिहासिक पाऊल” – सतीश वारजुकर
यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना सतीश वारजुकर म्हणाले की, “काँग्रेसमधील दिशाहीन कारभारामुळे सामान्य कार्यकर्त्यांची कामे करणे कठीण झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांना साथ देण्यासाठी आणि तालुक्याच्या प्रगतीसाठी आम्ही हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.”

काँग्रेस नेतृत्वहीन ; भाजपचे निर्विवाद वर्चस्व
वारजुकर हे चिमूरमधील काँग्रेसचे सर्वोच्च स्थानिक आधारस्तंभ होते. त्यांनीच पक्ष सोडल्यामुळे आता तालुक्यात काँग्रेस पूर्णपणे नेतृत्वहीन झाली आहे. विशेषतः शंकरपूर, नेरी आणि लगतच्या परिसरात आता भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले असून, आगामी निवडणुकांमध्ये याचे मोठे पडसाद उमटणार हे निश्चित मानले जात आहे.

error: Content is protected !!