Home सामाजिक चंद्रपूरच्या आदिवासी विद्यार्थ्यांची ‘भारत दर्शन’ सफर

चंद्रपूरच्या आदिवासी विद्यार्थ्यांची ‘भारत दर्शन’ सफर

291

जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली हिरवी झेंडी

२६ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान शैक्षणिक सहल

दिल्ली-राजस्थानमधील ऐतिहासिक स्थळांना देणार भेट

चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत आयोजित विद्यार्थ्यांच्या विशेष शैक्षणिक सहलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या हस्ते शासकीय आश्रमशाळा, बोर्डा येथून हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. २६ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या या सहलीत चंद्रपूर व चिमूर प्रकल्पांतील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील एकूण ४९ विद्यार्थी आणि ५ शिक्षक सहभागी झाले आहेत.

प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण हेच उद्दिष्ट
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिक्षणासोबतच नवीन ठिकाणांची ओळख, विज्ञान, इतिहास व संस्कृतीचा प्रत्यक्ष अभ्यास करणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व करिअरविषयक दृष्टीकोन व्यापक होण्यास मदत होते.” आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अत्याधुनिक साहित्यासह विद्यार्थी रवाना
सहलीस जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयामार्फत ब्लेझर, शूज, बॅग आणि कॅप अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. या नवीन गणवेशात विद्यार्थी अत्यंत उत्साहात दिसत होते. प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.” तसेच, या सहलीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले.

महत्त्वाच्या स्थळांना देणार भेट
या सात दिवसांच्या प्रवासात विद्यार्थी देशाची राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवन व संसद भवन पाहणार आहेत. तसेच आग्रा येथील ताजमहल आणि राजस्थानमधील मथुरा, जयपूर, जोधपूर व उदयपूर येथील ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

.      एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!