रामनगर जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता १५ दशलक्ष लिटरवर
अमृत योजनेअंतर्गत विस्तारीकरण पूर्ण
२५ हून अधिक प्रभागांतील पाणीपुरवठा होणार सक्षम
चंद्रपूर : शहरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची निकड ओळखून ‘अमृत’ योजनेअंतर्गत रामनगर येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या विस्तारीकरणाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे केंद्राची शुद्धीकरण क्षमता आता १०.५ दशलक्ष लिटरवरून थेट १५ दशलक्ष लिटरवर पोहोचली आहे.
![]()
जुण्या अडचणींतून सुटका
रामनगर येथील जुने केंद्र जीर्ण झाल्याने पाणी उपसा आणि पुरवठ्यात वारंवार तांत्रिक अडचणी येत होत्या. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केंद्राचा विस्तार करण्यात आला आहे. सध्या या केंद्राची मुख्य साठवणूक टाकीशी जोडणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे.
कोणाला मिळणार लाभ ?
या प्रकल्पामुळे नगीना बाग, चपराशी कॉलनी, महाकाली, भिवापूर, जटपुरा, रामनगर, सिस्टर कॉलनी आणि जगन्नाथ बाबा नगर यांसारख्या २५ प्रमुख भागांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे पाणीपुरवठ्याचा कालावधी वाढणार असून उन्हाळ्यात जाणवणारी तीव्र पाणीटंचाई आता दूर होण्यास मदत होईल.


