Home चंद्रपुर जिल्हा विशेष भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर !

भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर !

334

चंद्रपूर महापालिकेत सत्तेच्या पहिल्याच दिवशी ‘भूकंप’

महापौर पदग्रहण सोहळ्यावर १७ नगरसेवकांचा बहिष्कार

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकला खरा, मात्र विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच पक्षांतर्गत वादाचा स्फोट झाला आहे. नवनियुक्त महापौर संगीता खांडेकर यांच्या पदग्रहण सोहळ्यात भाजपमधील दोन गट आमनेसामने आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांना निमंत्रण नसल्याच्या कारणावरून त्यांच्या समर्थक १७ नगरसेवकांनी सोहळ्यावर बहिष्कार टाकत थेट बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

नेमकं प्रकरण काय ?

आज माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर संगीता खांडेकर यांचा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, निवडणूक प्रमुख आणि स्थानिक आमदार असूनही किशोर जोरगेवार यांना या अधिकृत कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. हा आपला अपमान असल्याचे मानत जोरगेवार समर्थक नगरसेवक संतप्त झाले.

महापालिकेत घोषणाबाजी आणि शाब्दिक चकमक

कार्यक्रमाच्या ठिकाणी जेव्हा जोरगेवार समर्थक पोहोचले, तेव्हा त्यांना निमंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे संतप्त झालेल्या १७ नगरसेवकांनी सोहळ्यावर बहिष्कार टाकून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुनगंटीवार समर्थक काही नगरसेवकांनी “बाहेर जा, तुमची गरज नाही” असे उद्गार काढल्याने वातावरण अधिकच तापले. दोन्ही गटांत जोरदार शाब्दिक चकमक झाली, ज्यामुळे महापालिका परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

आगामी काळातील आव्हाने

भाजपची सत्ता असलेल्या चंद्रपूर महापालिकेत पहिल्याच दिवशी अशा प्रकारे उघड गटबाजी समोर आल्याने प्रशासकीय कामावर याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. १७ नगरसेवकांचा हा मोठा गट भविष्यात महापौरांच्या निर्णयांना साथ देणार की विरोध करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!